सातारा / वडूज : वडूज पंचायत समितीचा सांख्यिकी विभागाचा विस्तार अधिकारी शरण देवीसिंग पावरा (वय 43, सध्या रा. दहिवडी ता.माण, सातारा मूळ रा. अंबापूर ता.शहादा जि. नंदूरबार) हा 5 हजार रुपयांची लाच घेताना जाळ्यात अडकला. 10 हजार रुपयांची मागणी केल्यानंतर 5 हजार घेताना ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केली. दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलातील पैसे जमा होण्यासाठी वर्ग 3 च्या अधिकार्याने पैसे घेतल्याचे समोर आले आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, ही कारवाई सोमवारी दुपारी झाली आहे. या प्रकरणातील तक्रारदारांना पुसेसावळी येथे घरकुल मंजूर झाले आहे. या घरकुलासाठी शरण पावरा याने तक्रारदारांना 70 हजार रुपयांचा हप्ता मंजूर करुन दिला. घरकुलाचे इतर हप्ते मंजूर करण्यासाठी शरण पावरा याने 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदारांनी एसीबी विभागात तक्रार केली.
लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्याचे स्पष्ट होताच 10 हजार रुपये ऐवजी पहिला हप्ता म्हणून 5 हजार रुपये निश्चित करण्यात आले. लाचेची रक्कम सोमवारी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबीचा विभाग वॉच ठेवून होता. लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीने रंगेहाथ पकडले. रात्री उशीरापर्यंत वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.