उंब्रज : उंब्रज ता. कराड येथील कॉलेज मार्गावर व पाटण तिकाटणा येथे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. सोमवार हा आठवडा बाजारचा दिवस आणि लग्नाची तिथ असल्याने व याठिकाणी उलट-सुलट दिशेने येणार्या वाहनामुळे सर्व्हिस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दिवसभरात वारंवार वाहतूक कोंडी झाल्याने वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती.
उंब्रज येथील पूर्व व पश्चिम बाजूचे सर्व्हिस रस्ते अरुंद असताना नागरिक जाणीवपूर्वक सर्व्हिस रस्त्यावर मोटरसायकल, कार उभी करीत असतात. तसेच विरुद्ध दिशेने येणार्या चार चाकी गाड्या, मोटरसायकल यासह अवजड वाहने व सध्या ऊस वाहतूक सुरू असल्याने सर्व्हिस रस्त्यावर वाहतूकीची कोंडी होवून वाहतूक ठप्प होत होती. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
सायंकाळच्या सुमारास सर्व्हिस रस्त्यावर वाहतूक ठप्प झाल्याने पाच मिनिटांच्या अंतरावर जाण्यासाठी वाहनधारकांना अर्धा तास लागत होता. परिणामी वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रवाशांनी महत्वाची भूमिका बजावली असल्याचे पहावयास मिळत होते.
बाजार दिवशी वाहन पार्कींगची समस्या...
सोमवार हा उंब्रजचा आठवडा बाजारचा दिवस असल्याने बाजारहाट करण्यासाठी उंब्रजसह परिसरातील गावातून येणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे बाजार मोठा भरला जातो. बाजार दिवशी नागरिकांना वाहन पार्कींगची समस्या प्रकर्षाने जाणवत असते. मोटरसायकल, कार पार्कींग करण्यासाठी जागा नसल्याने नागरिक जेथे जागा मिळेल तेथे गाडी पार्क करीत असल्याने वाहतूकीची समस्या प्रकर्षाने जाणवत आहे.