कोयनेच्या बॅकवॉटरलगत असलेल्या वेळे, ढेण, मायणी, तळदेव, देऊर गावांतील भोळीभाबडी लोकं अजूनही आदिवासींचे जीवन जगत आहेत. Pudhari Photo
सातारा

कोयना बॅकवॉटरलगतच्या गावात आदिवासींचे जीणे

पुढारी वृत्तसेवा

परळी : सोमनाथ राऊत

देशाला स्वातंत्र्य मिळाले, नवनवीन योजना सुरू झाल्या, संगणक युग सुरू झाले. मात्र अजूनही सातारपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोयनेच्या बॅकवॉटरलगत असलेली वेळे, ढेण, मायणी, तळदेव, देऊर ही गावे आदिवासींचे जीवन जगत आहेत.

कोयनेच्या बॅकवॉटरजवळ वसलेले वेळे हे गाव जावली तालुक्यात येते. या गावाला जायला ठोसेघर, चाळकेवाडीकडून खाली गेल्यावर पायवाट आहे. गावात वीज व आरोग्य सुविधांची कसलीही सोय नाही. चौथीपर्यंत शाळा आहे. ज्या वस्तीत ही शाळा भरते त्या ठिकाणी कोणीही राहत नाही. त्या ठिकाणी भूस्खलन झाले होते. गावची लोकसंख्या 600 च्या आसपास असून दोन-तीन किलोमीटर वर वसलेल्या वेगवेगळ्या वाड्या आहेत. दिवसाढवळ्याही हिंस्र प्राण्यांचा वावर या परिसरात आहे. तालुक्याला जायचं म्हटल्यावर वळसा टाकून सुमारे 100 किलोमीटर अंतर तोडून मेढ्याला जायचे, अशी या गावची आजची स्थिती आहे.

कोयना प्रकल्पबाधित, भूकंपग्रस्त, बफर झोनबाधित अशी या सर्वच गावांची ओळख आहे. त्यामुळे नागरी सुविधा नाहीत, रस्ता नाही. जुने गाव भूस्खलन झाल्याने वर्षानुवर्षे वन खात्याच्या जागेत आहे. मूळच्या जमिनी 1960 साली कोयना धरणासाठी संपादित झाल्या मात्र अजूनही पुनर्वसन झालेले नाही. उरलेली जमीन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गेली. गावकर्‍यांची पुनर्वसनाची मागणी आहे. त्यासाठी कित्येक आंदोलने केलीत, उपोषणे केली, मात्र दखल कोणीही घेतलेली नाही.

जनावरे शेतात पिके येऊ देत नाहीत. गावात रोजगार नाही. कुटुंबाच्या कुटुंबे पोटपाण्यासाठी स्थलांतरित झाली आहेत. गावाकडे वृद्ध माणसे जनावरे सांभाळत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे झाली मात्र अजूनही जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या सातारपासून काही अंतरावर असलेल्या या गावांची होरपळ थांबली नाही. त्यामुळे स्वातंत्र्याचा खरा अर्थ अद्याप आम्हाला उमगला नसल्याची भावना येथील गावकर्‍यांची आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT