Satara Heavy Rain
सातारा : मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीला पूर आला आहे. संगममाहुली येथे वेण्णा व कृष्णेच्या संगमावरील छत्रपती शाहू महाराज थोरले यांची समाधी पुराच्या पाण्याने वेढली आहे. Pudhari photo
सातारा

Satara Heavy Rain : महिला वाहून गेली; शेतकरी बेपत्ता

पुढारी वृत्तसेवा

सातारा / वाई / परळी : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे महाबळेश्वर, वाई, जावली, सातारा, कराड व पाटण तालुक्यांत धो धो कोसळणार्‍या पावसाने दाणादाण उडवली आहे. वाईच्या रविवार पेठेतील महिला ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेली असून परळी खोर्‍यात शेतात गेलेला शेतकरी बेपत्ता झाला आहे. दरम्यान, कोयना, कण्हेर आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून या नद्यांना पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • संगम माहुली येथील छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांची समाधी पाण्याखाली

  • परळी खोर्‍यात झाडे उन्मळून पडली, दगड-माती रस्त्यावर

  • लिंब-गोवे, किडगाव-हामदाबाज, मर्ढे पूल पाण्याखाली

  • पूल पाण्याखाली गेल्याने वाई तालुक्यातील जोर खोरे संपर्कहिन

  • पांगारे येथे अनेक घरांच्या भिंती पडल्या

जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. विशेषत: जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाची कोसळधार सुरूच आहे. गुरुवारीही दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पश्चिमेकडे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाई येथील रविवार पेठेतील किवरा ओढ्याला आलेल्या पुरात शिल्पा प्रकाश धनावडे (वय 47, रा. रविवार पेठ) ही महिला वाहून गेली असून तिचा शोध सुरू आहे. पावसामुळे रविवार पेठ येथील किवरा ओढ्यास पूर आला आहे. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कामावरून घरी परतत असताना पाय घसरल्याने शिल्पा प्रकाश धनावडे ही पुराच्या पाण्यात पडली. तिच्या काही वस्तू शेजारी सापडल्यामुळे ती ओढ्यात पडली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सातारा तालुक्यातील परळी खोर्‍यात मुसळधार पाऊस सुरू आहे. याच खोर्‍यातील ताकवली येथील शेतकरी कृष्णा गणपत वाईकर (वय 50) हे बुधवारी ताकवली येथून सांडवली येथे भात लावण करायला गेले होते. सांडवली येथून दुपारी परतही फिरले. मात्र, ते घरी ताकवली येथे पोहोचले नाहीत. सांडवली ते ताकवली हा डोंगर असून ओढ्यातून मार्ग गेला आहे. बुधवारी सायंकाळी व गुरुवारी दिवसभर शोध घेतल्यानंतरही ते मिळून आले नाही.

महाबळेश्वर-तापोळा या मुख्य मार्गावर चिखली शेड व वाघेरानजीक दरड कोसळली. परळी खोर्‍यात अनेक घरांच्या भिंती कोसळल्या. वाईच्या पश्चिम भागातही झाडे व विद्युत पोल कोसळण्याच्या घटना घडल्या. गोकुळ तर्फ पाटण या ठिकाणी कोयना नदीवर असलेल्या पुलावरून पाणी जात असल्याने या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कण्हेर व वीर धरणातून विसर्ग करण्यात आला आहे. कण्हेर धरणातून पाणी सोडल्याने वेण्णा व कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागली आहेत. त्यामुळे छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. तसेच संगम माहुली येथील नदीचे पात्र विस्तारले आहे. जावली तालुक्यात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी साठले. केळघर येथे पाणी वाढल्याने स्मशानभूमी पाण्याखाली गेली. पावसामुळे पुणे-बंगळूर महामार्गावरील ठिकठिकाणी असलेल्या भुयारी मार्गांमध्ये पाणी साठून राहिले. सातार्‍यातील म्हसवे, खेड, आनेवाडी, भुईंज, खंडाळा येथील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला.

गुरुवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत पडलेला पाऊस असा :

सातारा 47.9, जावली 139.5, पाटण 58.6, कराड 30.5, कोरेगाव 57.6, खटाव 26.7, माण 14.8, फलटण 13.3, खंडाळा 32.8, वाई 59.9, महाबळेश्वर 219.3 मि.मी पावसाची नोंद झाली.

SCROLL FOR NEXT