The division of seats between Chief Minister and Deputy Chief Minister is disturbed
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये जागावाटपावर खलबते Pudhari File Photo
सातारा

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये जागावाटपावर खलबते

पुढारी वृत्तसेवा

सातारा लोकसभा निवडणुकीत काही विधानसभा मतदारसंघांत मिळालेली मते, लोकांची मानसिकता या बाबी विचारात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात विधानसभा जागावाटपाबाबत तासभर खलबते झाली. विश्रामगृहावर आमदार, खासदारांसमक्ष कमराबंद चर्चा झाली असून लवकरच जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.लोकसभा निवडणुकीचे निकाल महायुतीसाठी धक्कादायक लागल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून सावध पवित्रा घेतला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे अनावरण व प्रदर्शन उद्घाटन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे शासकीय विश्रामगृहावर एकत्र होते. महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षाच्या प्रमुख नेत्यांची तासभर कमराबंद खलबतं सुरू होती. जागा वाटपाचा तिढा कुठं सोडवायचा यावर नेतेमंडळीत एकमत होत नव्हते. फडणवीस यांना पुण्यात भाजपच्या कार्यक्रमास जायचे होते तर मुंबईत यावर चर्चा करूया अशी अजित पवार यांची भूमिका होती. मात्र यावर तातडीने चर्चा होणे आवश्यक असल्याने या नेत्यांनी सातार्‍यात विधानसभा जागावाटपावर प्रदीर्घ चर्चा केली. सध्याच्या आमदारांना त्या-त्याठिकाणी संधी देणार असल्याने हे आमदार सेफ होणार आहेत. मात्र जेथे विरोधी गटाचे आमदार आहेत, त्याठिकाणी उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. मकरंद पाटील,आ. महेश शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आदी नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT