कराड : शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना कराड तालुक्यातील मलकापूर परिसरात उघडकीस आली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला शिक्षकानेच 'प्रपोज' करून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र कसबे असे संशयित शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील एका शाळेत पीडित मुलगी नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मागील महिन्यात २८ जानेवारीला सकाळी साडेनऊच्या सुमारास संशयित शिक्षकाने तिला वर्गाबाहेर बोलावले आणि त्यानंतर "तू चार दिवस शाळेत का आली नाहीस?" अशी विचारणा केली. तसेच शिक्षकाने तिच्याशी मैत्रीबाबत विचारणा केली. या प्रकारानंतर संबंधित शिक्षकाने वारंवार त्या विद्यार्थिनीस वर्गाबाहेर भेटण्यासाठी बोलावण्यास सुरुवात केली.
शिक्षकाच्या भीतीमुळे संबंधित मुलगी वर्गाबाहेर त्या शिक्षकाकडे जात नव्हती. त्यानंतर शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास संबंधित शिक्षकाने पुन्हा तिला वर्गाबाहेर बोलविले होते. भीतीपोटी संबंधित मुलीने आपल्या तीन मैत्रिणींना आपल्या सोबत घेऊन बाहेर गेली. मात्र शिक्षकाने इतर तिघींना वर्गात पाठविले आणि पीडित मुलीला थांबवले. "मी तुला चार दिवस बोलवत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्स अॅपवर ऑनलाईन का असतेस ? मी तुझ्यावर प्रेम करतो," असे म्हणत तिचा हात पकडल्याचा दावा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने हात झटकून वर्गात धाव घेतली. ही घटना तिने मैत्रिणींसह आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी कराड शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. रविवारी संबंधित पिडीत मुलीच्या तक्रारीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात संशयित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.