Talathi and Circle Officer Absent  (Pudhari File Photo)
सातारा

Talathi and Circle Officer Absent | तलाठी, सर्कल गेले कुणीकडे?; बळीराजापुढे कोडे

Farmers Inconvenience | कामाच्या ठिकाणी हजर राहत नसल्याने शेतकर्‍यांची गैरसोय; कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

वैभव पाटील

उंडाळे : कराड दक्षिणच्या डोंगरी भागात राज्य शासनाचे महसूल विभागातील तलाठी व सर्कल हे दोन्ही अधिकारी आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहत नसल्याने शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा छोट्या-छोट्या कामासाठी कराडला हेलपाटे मारावे लागत असल्याने संबंधित कर्मचार्‍यांनी आपल्या कामाचे वेळापत्रक नियुक्तीच्या ठिकाणी लावावे व नियुक्त ठिकाणी सजात हजर राहावे, अशी मागणी होत आहे. अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू किंवा तहसीलदार कार्यालयाच्या दारात उपोषण करू, असा इशारा परिसरातील शेतकर्‍यांनी दिला आहे.

कराड दक्षिण या डोंगरी विभागात माजी मंत्री स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांनी सामान्य नागरिक व जनतेच्या समस्या जागेवर सुटाव्यात यासाठी गावोगावी शक्य तेवढ्या शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार उंडाळे भागात उंडाळे, येळगाव येथे महसूल विभागाचे मंडल कार्यालय सुरू केले. त्यामुळे विभागातील शेतकर्‍यांना व सामान्य जनतेला शासकीय कामासाठी अन्यत्र हेलपाटे मारावे लागू नयेत, याची काळजी घेत सामान्य लोकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. परंतु अलीकडे काही महिन्यांपासून या कार्यालयात शासकीय कर्मचारी, तलाठी, सर्कल हजर राहत नाहीत. हे सर्व कर्मचारी कराडात राहून आपला शासकीय कामकाजाचा डोलारा सांभाळत आहेत. त्यामुळे साध्या-साध्या कामासाठी शेतकर्‍यांना व सामान्य नागरिकांना कराड येथे हेलपाटे मारावे लागत आहेत.

साध्या-साध्या कामासाठी त्यांना दिवस घालवावा लागत आहे. याशिवाय आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. उंडाळे विभागातील उंडाळे, येळगाव या दोन सर्कल कार्यालयाअंतर्गत अनेक तलाठी कार्यालये आहेत. परंतु या विभागात तलाठी अथवा सर्कल आपल्या उपस्थितीत ठिकाणी हजर राहत नाहीत. शिवाय कामकाजासाठीही वेळेवर हजर नसतात. त्यामुळे सामान्य जनतेला व शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. किरकोळ कामासाठी शेतकर्‍यांना आपले कामकाज सोडून तलाठी व सर्कल यांची वाट पाहत दिवस घालवावा लागत आहे. तरीही शेतकरी महत्त्वाचे काम असल्याने आपला वेळ खर्च करतात. परंतु शासकीय कामासाठी पगार घेणारे कर्मचारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, अशी परिस्थिती आहे.

शासनाने शेतकर्‍यांच्या व सामान्य नागरिकांच्या हितासाठी त्यांची कामे जागेवर व्हावीत व त्यांना त्रास होऊ नये अशी भूमिका घेऊन शासन आपल्या दारी योजना आखली. परंतु सध्या शासनाचे नियुक्ती कर्मचारी आपल्या नियुक्त ठिकाणी किंवा कार्यालयात हजर राहत नाहीत, हे दुर्दैव आहे. तालुकास्तरावर हजर राहून ते नियुक्त ठिकाणाचा गाडा हाकतात. त्यांचा नेमका ठाव, ठिकाणा कळत नाही. जेव्हा सर्कल किंवा तलाठी कुठे आहेत, याबाबत विचारणा केली जाते तेव्हा वरिष्ठांनी बोलावले आहे, मीटिंग आहे, यासह नेहमीच्या शैलीतील उत्तरे दिली जातात. त्यामुळे सर्कल, तलाठी रोजच मिटींगला असतात का? याची खातर जमा वरिष्ठांनी करणे गरजेचे आहे.

रोजच मीटिंग घ्यायची आहे तर मग ग्रामीण भागात तलाठी व सर्कल शासकीय कार्यालयात हजर केव्हा राहतात, याबाबत या तलाठी व सर्कल यांनी आपले हजेरी वेळापत्रक नियुक्त कामकाजाच्या ठिकाणी लावावे म्हणजे शेतकर्‍यांनाही त्यांच्या वेळेनुसार कार्यालयात हजर राहता येईल. त्यांची कामे करून घेता येतील. परंतु याबाबत असे कोणतेही वेळापत्रक ग्रामीण भागात लावले जात नाही. उलट त्यांनी बेकायदेशीरपणे हाताखाली नियुक्त केलेले कर्मचारी व कोतवाल सामान्य जनतेवर साहेबगिरी करत सामान्य नागरिकांची लूट करत आहेत. याला आवर घालण्यासाठी वरिष्ठांनी तलाठी व सर्कल यांना नियुक्तीच्या ठिकाणी का हजर राहत नाहीत? याबाबत विचारणा करणे गरजेचे आहे. याशिवाय हजर न राहणार्‍या कर्मचार्‍यांवर शासकीय नियमानुसार कारवाई करणे गरजेचे आहे. हे जर होणार नसेल तर सामान्य शेतकरी शासनाच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या भागातील शेतकर्‍यांनी दिला आहे.

ग्रामीण भागात असणार्‍या शासकीय कार्यालयातील तलाठी व सर्कल यांना आपल्या कामाचे नियोजित वेळापत्रक आपल्या कामाच्या ठिकाणी लावावे. नियमित कामकाजा करून शेतकर्‍यांना व सामान्य नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी या विभागातील शेतकर्‍यांनी तहसीलदार कल्पना ढवळे यांच्याकडे केली आहे. तहसीलदार यांनी आश्वासन देऊनही उंडाळे, येळगाव सर्कलमध्ये तलाठी व सर्कल यांनी आपले नियोजित वेळापत्रक कार्यालयात लावले नाही. ते कामकाजाच्या वेळेत हजर राहिलेले आढळून आले नाहीत. याबाबत निवेदन देण्यात आले असून त्याच्या प्रती तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, आ.डॉ अतुल भोसले, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्या आहे.

  • शेतकर्‍यांना दाखल्यासाठी मारावे लागतात हेलपाटे

  • कराडातून केली जातात शासकीय कामे

  • पैशांबरोबरच सर्वसामान्यांचा वेळही जातोय वाया

  • जनतेवर साहेबगिरी करत सामान्य नागरिकांची लूट

  • तहसीलदारांकडून कोणतीही कारवाई नाही...

तहसीलदारांकडून कोणतीही कारवाई नाही...

उंडाळे व येळगाव महसूल मंडळातील तलाठी व सर्कल यांनी आपले शासकीय कार्यालयात हजर वेळेचे वेळापत्रक त्यांच्या नियुक्त कामाच्या ठिकाणी लावावे. याबाबत कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांना सागर जाधव व ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भेट घेऊन तोंडी विनंती केली होती. परंतु, तहसीलदारांनी याबाबत कोणती कारवाई केली नाही. केवळ तोंड देखली आश्वासन देऊन त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला जात आहे.

सामान्य शेतकर्‍यांनी तहसीलदार यांना लेखी निवेदन देत तलाठी व सर्कल यांनी आपल्या कामकाजाचे शासकीय वेळापत्रक कार्यालयात लावावे. शासन नियमानुसार नियुक्त ठिकाणी हजर राहावे, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू किंवा तहसीलदार कार्यालयाच्या दारात उपोषण करू.
सागर जाधव, त्रस्त ग्रामस्थ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT