फलटण: महिन्यापूर्वी इथे दुर्दैवी घटना घडली. त्या दिवसापासून त्या घटनेकडे आमचं चौफेर लक्ष आहे. सध्या त्या घटनेची एसआयटी चौकशी सुरू आहे. सरकारनेही कडक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात एक माणूस जो थेट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याच्यात सहभागी आहे. त्याला त्यात पकडल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही.
त्या माय माऊलीला हतबल होऊन ते कृत्य करायला ज्याने कोणी लावलं असेल त्याची गय करणार नाही. यात सहभागी असणार्यांना कडक शासन केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, असा सूचक इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.
दरम्यान, शिवसेने पुढे कोणाचीही दहशत चालत नाही. फलटणकरांना निर्भयपणे जगता येईल असं मोकळं वातावरण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण निर्माण करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. फलटण येथील शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि कृष्णा भीमा विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जि. प. चे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जि. प. च्या माजी सदस्या शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, सुभद्राराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, युवा नेते सत्यजितराजे नाईक निंबाळकर, सचिन सूर्यवंशी बेडके, शिवसेनेचे संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शारदा जाधव, नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.
ना. शंभूराज देसाई म्हणाले, जीवाला जीव देणारे ना. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व तुमच्या पाठीशी आहे. आता तुम्हाला भिण्याचं कारण नाही. फलटणला दहशतीचे वातावरण आहे, असं सांगितलं जातं आहे. पण शिवसेना व एकनाथ शिंदे यांच्यापुढे कुणाची दहशत चालणार नाही. मंत्री असल्याने आम्हालाच त्यांनी संयमाने घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पण ठराविक मर्यादा जर कोणी पार केलीच तर शिवसेनेचा बाणा पुढे येतो. फलटण शहरातील नागरिकांना निर्भयपणे जगता यावे असे मोकळे, निर्मळ वातावरण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आपण निश्चित निर्माण करू. ना. देसाई पुढे म्हणाले फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत राजे कुटुंबियांना काही सांगण्याची गरज नाही.
लोकांची सेवा करण्याची चार पिढ्यांची परंपरा या कुटुंबाकडे आहे. जीवाला जीव देणारे नेतृत्व नामदार एकनाथ शिंदे 28 तारखेला फलटणला येणार आहेत. नगरविकास खातं फलटणला येत आहे. तेव्हा फलटणकरांना काय हवे आहे ते त्यांना मागा फलटणच्या विकासाचा रोड मॅप अनिकेतराजेंच्या मार्गदर्शनाखाली तयार करा, असे आवाहन त्यांनी केले.
माजी आमदार दीपक चव्हाण म्हणाले, फलटण तालुक्याला विकासाची दिशा देण्याचे काम आमदार रामराजेंनी केले आहे. इथल्या विकास कामांचे मास्टर माईंड आमदार रामराजे आहेत. संजीवराजे म्हणाले, फलटण शहराची शांततेची व सुसंस्कृतपणाची घडी आ. रामराजे यांनी निर्माण केली ती विस्कटू नये यासाठी काही निर्णय घेणे आवश्यक होते.
शहर व तालुक्याचा विकास त्याचबरोबर सर्वसामान्यांची काम व्हावीत व त्यांना आधार व संरक्षण मिळावं यासाठी शिवसेनेचा निर्णय घेतला आहे. आता जे काही बरं वाईट होईल ते शिवसेनेतच होईल हा आपला अंतिम निर्णय असल्याचे ते म्हणाले. रघुनाथराजे म्हणाले, शिवसेनेत प्रवेश केल्याने कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली असुरक्षितेची भावना निश्चितच नष्ट होईल. आगामी काळात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेनाच ठरवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अनिकेतराजे म्हणाले, फलटणमध्ये पसरलेले भीतीचं वातावरण आपण शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आता राहणार नाही. कुटुंबाचा जनसेवेचा वसा कायम ठेवत फलटणचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
संपूर्ण राजे गट धनुष्यबाणावर
फलटणच्या राजे गटाने शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या माध्यमातून नगरपालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राजे गटाचे सर्व उमेदवार धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढत आहेत. राजे गटाने नवा राजकीय डाव टाकल्यामुळे फलटणची निवडणूक रंगतदार स्थितीत येवून ठेपली आहे.
दहशत करणार्याला पाठिंबा देणार्या अधिकार्यांची गय केली जाणार नाही...
कुठल्याही प्रशासकीय अधिकार्याने कोणाच्याही दहशतीखाली दडपणाखाली काम करण्याची आवश्यकता नाही. प्रशासनातील अधिकारी कोणाचीतरी एकाची बाजू घेऊन दहशत करणार्यांना पाठबळ देतात, अशी कोणाही नागरिकाची माझ्याकडे तक्रार आली तर त्या अधिकार्याची अजिबात गय करणार नाही. चौकशीत अधिकारी दोषी आढळल्यास पालकमंत्री या नात्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करु, असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.