Satara Politics : रणांगण तापले; कुरघोड्यांना ऊत

नगरपालिका रणधुमाळी : एकमेकांवर तोंडसुख
Satara Politics : रणांगण तापले; कुरघोड्यांना ऊत
File Photo
Published on
Updated on

सातारा : जिल्ह्यात नऊ नगरपालिका व एका नगरपंचायतीच्या निवडणुकीचे घमासान सुरू झाले आहे. उमेदवारी अर्जांच्या माघारीनंतर निवडणुकीचे रणांगण चांगलेच तापू लागले आहे. सर्वच उमेदवारांनी प्रभागांमध्ये भिरकीट सुरू केली आहे. समाज, भावकी, जात यांची गणिते बांधायला आता सुरुवात झाली असून, राजकीय कुरघोड्यांना ऊत आल्याचे पाहायला मिळत आहे. एकमेकांवर तोंडसुख घ्यायलाही सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यात सातारा, कराड, मलकापूर, वाई, फलटण, महाबळेश्वर, पाचगणी, म्हसवड, रहिमतपूर या नगरपालिका व मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीत रणांगण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी महायुतीतच घमासान झाले आहे. भाजपने जागोजागी स्वबळ आजमावण्याचा प्रयत्न केला असून घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी भाजपविरोधात सवती चूल मांडल्याचे चित्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच भाजपने अनेकांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवाऱ्या दिल्या. ऐनवेळी पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर भाजपविरोधातील मंडळी आगपाखड करू लागले आहेत. अतिशय शेलक्या शब्दांमध्ये ते पक्षातून बाहेर पडलेल्यांवर तोंडसुख घेतानाही पाहायला मिळत आहेत.

नगपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या निमित्ताने चमत्कारिक युत्या, आघाड्या झाल्या आहेत. भाजपला रोखणे हाच विरोधकांसह महायुतीमधील घटक पक्षांचाही अजेंडा असल्याचे समोर येते. साताऱ्यात खा.श्री.छ. उदयनराजे भोसले व ना. शिवेंद्रराजे भोसले या दोन्ही राजेंची एकत्रित मोट बांधण्यात भाजपला यश आले असले तरी अनेक ठिकाणी बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे.

वाईत राष्ट्रवादी विरुध्द भाजप असाच सामना रंगला आहे. ना. मकरंद पाटील, ना. जयकुमार गोरे यांनी या ठिकाणी आपले राजकीय कसब पणाला लावले आहे. ना. गोरे यांच्या रसदीमुळे माजी आमदार मदन भोसले यांच्या गटाला नवी ऊर्मी मिळाली आहे. फलटणमध्ये ना. अजित पवार आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आ. रामराजे गटाला शह देण्याचे राजकारण केले आहे. राजे गटाने धनुष्यबाण हाती घेतला तर कमळाला घड्याळाची ताकद मिळाली आहे. रहिमतपुरात ना. अजित पवार, ना. मकरंद पाटील, खा. नितीन पाटील यांनी सुनील माने यांचे हात बळकट करण्याचे प्रयत्न केले असून काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) यांना सोबत घेऊन त्यांनी भाजपचे आ. मनोज घोरपडे यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी व्यूहरचना आखली आहे.

म्हसवड पालिकेत तर भाजपविरोधात सर्वपक्षीय आघाडीची ताकद लावण्यात आली आहे. ना. जयकुमार गोरे विरुद्ध सर्वपक्षीय विरोधक असे चित्र म्हसवडमध्ये आहे. दरम्यान, मेढ्यात भाजप व शिवसेना शिंदे गटातच टस्सल पहायला मिळत असून येथील वातावरणही तापले आहे.

साताऱ्यात बंडखोरांकडून जाहीर आव्हाने...

पाच वर्षे पक्षासाठी घासूनही ऐन निवडणुकीत उमेदवारी डावलली गेली. स्थानिक नेतृत्वाकडून आमच्यावर अन्याय झालाय. आमची खदखद पक्षाच्या सर्वोच्च नेत्यापर्यंत जावी, ही आमची भावना आहे. ज्यांचा प्रभागात राबता नाही, प्रभाग कुठून सुरू होतो अन्‌‍ कुठे संपतो?, हेही ज्यांना माहीत नाही, अशांना उमेदवारी देऊन नेत्यांनी काय साधले? असे जाहीर आव्हान बंडखोर देताना साताऱ्यात दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news