सातारा : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केल्यास चांगला नफा मिळवून देतो, असे सांगून साताऱ्यातील एकाची सुमारे 61 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक झाली. धक्कादायक बाब म्हणजे व्हॉटस्अप मेसेजवरून हा केवळ संवाद झाला आहे. तक्रारदार हे सेवानिवृत्त असून सेव्हिंग, पीएफ तसेच त्यांनी उसने पैसे घेतलेले आहेत.
जावेद मेहबूब शेख (वय 57, रा. विलासपूर, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना 20 जुलै ते ऑगस्ट 2025 या एक महिन्याच्या कालावधीत घडली आहे. तक्रारदार हे एमआयडीसी येथील एका कंपनीमधून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांची बचत असलेली रक्कम तसेच पीएफचे पैसे बँकेत होते.कंपनीची मोठी रक्कम एकदम बँकेत जमा झाल्याने त्यांनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचे ठरवले. जुलै 2025 मध्ये अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन त्यांना ट्रेडिंग करण्याबाबतचा मेसेज आला.
अनोळखी संशयिताने तक्रारदार यांना डी -मॅट खाते काढायला सांगून लिंक पाठवल्या. त्या लिंक ओपन करायला लावून अधिक नफा मिळवून देतो, असे खोटे आश्वासन दिले. त्यानुसार तक्रारदार यांनी संशयितांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. 50 हजार ते 3 लाख रुपयांच्या रुकमा 40 वेळा तक्रारदार यांनी संशयिताने दिलेल्या बँक खात्यावर पाठवल्या. संशयित आणखी रक्कम भरण्यास सांगत होते. मात्र, तक्रारदार यांनी गुंतवणूक तेवढीच करायचे असल्याचे सांगत होते. फसवणूक होत असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मूळ रक्कम परत पाठवण्यास सांगितली. मात्र संशयितांनी फोन उचललेे नाहीत. कोणताही प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याने अखेर तक्रारदार यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
फ्री टिप्स, माहितीचा बनाव
अनोळखी व्यक्तीने सुरुवातीला तक्रारदार यांना पहिले 10 दिवस कोणते शेअर घ्यायचे, याबाबतच्या फ्री टिप्स दिल्या. त्यातून फायदा होत असल्याचे व अनोळखी व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये तो हुशार असल्याचे तक्रारदार यांना भासवले. यातूनच तक्रारदार यांनी संशयिताने सांगितलेल्या बँक खात्यावर मोठ्या रकमा पाठवल्या.