

सोलापूर : नोटा, सोन्याचे नाणे आणि सोन्याचे बिस्कीट दाखवून तुम्हालाही सोने आणून देतो, असे सांगत विश्वास संपादन केला. या माध्यमातून दोघांची पन्नास लाख 96 हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली. ही घटना 2023 ते 2025 या कलावधीत घडली.
शहरातील टेळे नगरातील शेटे वस्ती लक्ष्मी पेठेत राहणारे सचिन सुरेश अपराध व त्याचे मित्र किशोर घोंगडे यांचे राकेश अण्णा (रा. काकीनाडा आंध्र प्रदेश), दीपक घुटे (रा. रुई ढोकी, धाराशिव) आणि आनंद निंबाळकर (रा. धाराशिव) या तिघांनी या दोघा मित्रांचा विश्वास संपादन केला. यादरम्यान त्यांना सोन्याचे नाणे, नकली नोटा व सोन्याची बिस्किटेही दाखवली. तुम्हालाही सोने घेऊन देतो असे आमिष दाखवले. त्यासाठी संशयितांनी सप्टेंबर 2023 ते जानेवारी 2025 या काळात 50 लाख 96 रुपये घेतले.
त्याबदल्यात अपराध व घोंगडे यांना नकली नोटा व सह्याचे धनादेश दिले. तसेच जर पोलिसांत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केल्यास तुमचे पैसे बुडतील, अशी भीतीही घातली. मात्र फसवणूक झाल्याने अपराध व घोंगडे यांनी फौजदार चावडी पोलिसांत फसवलेल्या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.