कराड : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला पिपाणी या चिन्हामुळे फटका बसला होता. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. मात्र, निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह कायम ठेवले आहे. त्याचवेळी पिपाणी हे चिन्ह लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक मोठे व स्पष्ट केल्याचे निवडणूक आयोगाने आम्हाला कळविले आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत तुतारी या चिन्हाला पिपाणीचा फटका बसणार नाही, अशी अपेक्षा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
बुधवारी इस्लामपूर (जि. सांगली) येथील नियोजित कार्यक्रम आटोपून खा. शरद पवार हे कराडमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी आले होते. गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास खा. पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्यासोबत कराड विमानतळावरून मुंबईकडे रवाना झाले. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना खा. पवार यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी व तलवार हटविण्याचा निर्णय घेत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी देशाला एक नवी दिशा दिली आहे. यापूर्वी असा विचार देशात कधीच झाला नव्हता असे सांगत, खा. पवार यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले.
आ. बबनदादा शिंदे आमच्यासोबत होते आणि आमच्याच विचाराने आमदार झाले होते. मध्यंतरी त्यांनी वेगळी भूमिका घेतली असली, तरी व्यक्तिगत संबंध आजही आहेत. त्यामुळे ते भेटायला आले होते, असे सांगत या विषयावर अधिक भाष्य न करणेच खा. पवार यांनी पसंत केले. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी किती जागा लढविणार, याचा निर्णय आ. जयंत पाटील घेणार आहेत. तसेच हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा अन्य निवडणुकांवर परिणाम होणार नाही, असा विश्वासही खा. शरद पवार यांनी व्यक्त केला.
आपण पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून येण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, हीच मोठी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहर्याबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे. त्यामुळे या विषयावर जाहीरपणे बोलणे योग्य होणार नाही, असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.