कोल्हापूर : खा. शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या कोल्हापूर दौर्यात (Sharad Pawar Kolhapur visit) राजकीय पेरणी केली. आता मतदानाच्या पावसावर त्याची उगवण अवलंबून आहे. जिल्ह्यात शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा एकही आमदार नाही. त्यामुळे राजकीय ताकद निर्माण करण्यासाठी त्यांना चार दिवस कोल्हापुरात मुक्काम ठोकावा लागला. कागल आणि चंदगडचे आमदार सोडून गेले. त्यापैकी कागलचे दु:ख पवार यांना सर्वाधिक झाले. ते त्यांच्या भाषणातून दिसले. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर त्यांनी हल्ला चढविला. मुश्रीफ यांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. आता सामना खर्या अर्थाने सुरू झाला. याचवेळी राधानगरी-भुदरगड, शिरोळ आणि इचलकरंजी या मतदारसंघांवर शरद पवार गट हक्क सांगेल. ‘कोल्हापूर उत्तर’साठीही ते आग्रही आहेत. (Kolhapur political news)
पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा आपले बस्तान बसविण्यासाठी पवार (Sharad Pawar) आक्रमक झाले आहेत. यातूनच साखर पट्ट्यातील नेत्यांना आपल्या बाजूला वळविण्यात ते कमालीचे आग्रही आहेत. लोकसभेला मोहिते-पाटील यांच्या रूपाने मोठा मोहरा त्यांना मिळाला. त्यानंतर विधानसभेत कागलच्या शाहू सहकार समूहाचे सर्वेसर्वा समरजित घाटगे हे अलगदपणे पवार यांच्या गोटात दाखल झाले. अर्थात मुश्रीफ महायुतीचे घटक झाल्याने घाटगे यांच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता हे ही तेवढेच सत्य आहे. त्यांच्या एकत्र येण्याने दोघांचीही गरज पूर्ण झाली आहे.
मुश्रीफ (Hasan Mushrif) 1999 पासून पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले. मंडलिक -मुश्रीफ संघर्षातही पवार यांनी मुश्रीफ यांना झुकते माप दिले. तरीही मुश्रीफ गेले याचे दु:ख पवारांनी भाषणातून बोलून दाखवले. अडचणी येतात, संघर्ष होतो; मात्र संघर्षात साथ द्यायची असते. पळून जाणार्या लाचारांना कागलची जनता साथ देणार नाही, असे सांगून पवार यांनी मुश्रीफांवर तोफ डागली. सुमारे 1985 पासूनच्या राजकारणात पवार (Sharad Pawar) यांनी कायमपणे मंडलिक गटाला कागलच्या राजकारणात साथ दिली होती. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांच्यात कडवा राजकीय संघर्ष होता. या संघर्षात पवार यांनी घाटगे यांना मदत केल्याचे ऐकिवात नाही. (Kolhapur political news)
उलट काँग्रेसमधील या गटबाजीला आणि साईडलाईन करण्याच्या राजकारणाला कंटाळून विक्रमसिंह घाटगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि लोकसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हेच त्यांचे प्रतिस्पर्धी होते. घाटगे पराभूत झाले आणि तेव्हापासून ते राजकारणात फारसे सक्रिय झाले नाहीत. मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी बदलत्या राजकारणात शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडली आणि कागलच्या राजकारणाला उकळी फुटली. एरवी घाटगे यांना साथ न देणार्या पवार यांच्यावर समरजित घाटगे यांना राजकारणात ताकद द्या, हे सांगण्याची वेळ आली. बदलत्या राजकारणाचा हा परिणाम आहे. पवार यांनी पेरणी केली. आता मतदार मतदानाचा पाऊस कोणावर पाडायचा हे ठरवतील आणि कागलच्या राजकीय संघर्षाचा निकाल लागेल.
पवार (Sharad Pawar) यांच्या आरोपानंतर मुश्रीफ यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. एका अल्पसंख्याकाच्या मागे पवार का लागलेत कळत नाही, असे सांगून मुश्रीफ यांनी आपल्यावरील वैयक्तिक हल्ल्याला व्यापक रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी स्थानिक राजकारणात सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे यांच्या लढाईत राजा विरुद्ध प्रजा असा जो मुद्दा वापरत होते तोच मुद्दा काढून मुश्रीफ यांनी या वादाला नव्याने बत्ती दिली आहे. तर आताच अल्पसंख्याकाचा मुद्दा का काढला? मुश्रीफ जातीचे कार्ड खेळत आहेत. पवार यांनी पदे दिली तेव्हा त्यांना हे का आठवले नाही? असे सांगून समरजित यांनी त्यांच्यावर आरोप केला आहे. (Kolhapur political news)
चंदगडचे आ. राजेश पाटील पवार यांना सोडून अजित पवार यांच्याकडे गेले आहेत. तेथील राजकारणात पवार यांनी राजेश पाटील यांचे वडील नरसिंग गुरुनाथ पाटील यांना साथ दिली होती; मात्र नंतर त्यांच्यात बिनसले. आता पवार तेथे डॉ. नंदिनी बाभूळकर यांना आखाड्यात उतरविण्याच्या तायरीत आहेत. चंगडला उमेदवारांची मांदियाळी आहे. कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार हे आताच सांगणे अवघड आहे. बदलत्या राजकारणात तेथे बदल होऊ शकतात.
राधानगरी-भुदरगडचे राजकारण आता मेहुणे-पाहुणे यांच्याभोवती फिरत आहे. शिंदे शिवसेनेचे प्रकाश आबिटकर तेथे आमदार आहेत. दोनवेळा या मतदारसंघातून शिवसेनेने विजय मिळविला आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे जाईल. त्याची तयारी के. पी. पाटील यांनी केली आहे. प्रसंगी मशाल हाती घेण्याचे त्यांचे नियोजन आहे, तर ए. वाय. पाटील हे अजित पवार यांची साथ सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. पवार (Sharad Pawar) यांना हा मतदारसंघ हवा आहे. मात्र महाविकास आघाडीत मतदारसंघ कोणाकडेही गेला तरी आपल्याला उमेदवारी हवी यासाठी के. पी. पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत.
शिरोळ आणि इचलकरंजी हे दोन मतदारसंघ शरद पवार गटात चर्चेसाठी आहेत. मात्र ‘कोल्हापूर उत्तर’साठी त्यांचा कमालीचा आग्रह आहे. सध्या येथे काँगे्रसच्या जयश्री जाधव आमदार आहेत. त्यामुळे पवार यांचा आग्रह कितपत मानला जाणार हे पहावे लागेल. एकूणच पवार यांनी पेरणी केली असली तरी राजकीय हवामान पिकाची उगवण ठरवणार आहे.
शरद पवार यांनी चार दिवसांच्या कोल्हापूर दौर्यात अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेचे नेतेही पवार यांना भेटले. विशेषतः लोकसभेला पराभूत झालेले सत्यजित पाटील-सरूडकर यांनी पवार यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे. पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघातून विनय कोरे यांच्या विरुद्ध सरूडकर दंड थोपटणार आहेत. या मतदारसंघासह अन्यत्र पवार यांनी केलेल्या जोडण्या हा सध्या चर्चेचा विषय आहे.