सातारा : पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर वणवण फिरणार्या एका फिरस्त्या महिलेच्या वेदनेचा टाहो ऐकून परिसरातील महिला धावून आल्या आणि माणुसकीचे एक अनोखे दर्शन घडले. प्रसववेदनांनी कळवळणार्या या महिलेची रस्त्यावरच सुखरूप प्रसूती करत त्यांनी एका जीवाला जीवदान दिले. ही घटना हृदयस्पर्शी असली, तरी शासनाच्या आरोग्य सुविधा खर्या गरजूपर्यंत पोहोचत नसल्याचे कटू वास्तवही या निमित्ताने समोर आले आहे.
सातारा शहरातील विलासपूर, गिरीदर्शन कॉलनी परिसरात कचरा आणि भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणार्या अनेक वंचित कुटुंबांपैकीच ती एक होती. गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांतही पोटासाठी तिची धडपड सुरू होती. भल्या पहाटे घराबाहेर पडून कचर्याच्या ढिगार्यातून भंगार गोळा करायचे आणि त्यातून मिळणार्या तुटपुंज्या पैशात कुटुंबाचा गाडा हाकायचा, हा तिचा दिनक्रम. अठराविश्व दारिद्य्र आणि आरोग्याच्या सुविधांशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या या जगात ती जगत होती.
दुपारच्या वेळी तिला अचानक प्रसववेदना सुरू झाल्या. वेदना असह्य झाल्याने ती मदतीसाठी कळवळू लागली. तिचा तो हृदय पिळवटून टाकणारा आवाज ऐकून परिसरातील सुप्रिया पाटील, प्रणिता पाटील, अर्चना शिंदे, धनश्री वाघ, रंजना पाटील आणि शशिकला रेपाळ या महिला तत्काळ तिच्या मदतीला धावल्या. त्यांनी त्या अनोळखी महिलेची अवस्था पाहिली आणि क्षणाचाही विलंब न करता तिला धीर दिला. कुणी पाणी आणले, कुणी आधार दिला आणि माणुसकीच्या नात्याने या सर्व महिलांनी मिळून रस्त्यावरच तिची प्रसूती केली.
तिने एका गोंडस मुलाला जन्म देताच त्या सर्व महिलांच्या चेहर्यावर समाधान आणि आनंदाचे भाव उमटले. त्यांनी तातडीने एका खासगी डॉक्टरला बोलावून बाळाची नाळ कापली आणि आवश्यक प्रथमोपचार केले. काही वेळाने ती माता आपल्या नवजात बाळाला घेऊन तिच्या पाऊलवाटेने निघून गेली. या महिलांनी दाखवलेल्या या धाडसामुळे आणि करुणेमुळे एका आई आणि बाळाचे प्राण वाचले. मात्र, या घटनेने एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. शासनाच्या अनेक आरोग्य योजना आणि गावोगावी आरोग्य केंद्र असतानाही, समाजातील सर्वात वंचित आणि गरजू घटकांपर्यंत त्या का पोहोचत नाहीत? या घटनेने या व्यवस्थेतील त्रुटी उघड केल्या आहेत.