मारूल हवेली : पुढारी वृत्तसेवा : पाटण तालुक्यातील नाडे (नवारस्ता) येथील सांगवड पुलाजवळ दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत ३ जण ठार झाले. तर २ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री झाला.
भरत रामचंद्र पाटील (वय २३) व बबन धोंडीराम पडवळ (वय ७०), दोघेही रा. येरफळे ता.पाटण, नितीन बबन तिकुडवे (वय ३६, रा. शिंदेवाडी ता. पाटण) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर अनिकेत ज्ञानदेव पाटील (रा. शिंदेवाडी) व संकेत सिताराम शिंदे (वय २१ रा. तामकणे) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत मल्हारपेठ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार रात्री नाडे (नवारस्ता) गावच्या हद्दीतील सांगवड पुलावरून मोटरसायकल (क्र.एम.एच.50 ई 7229) वरून नितीन तिकुडवे आणि अनिकेत पाटील हे दोघे जात होते. यावेळी मरळीहून नवारस्ताच्या दिशेने भरत पाटील, बबन पडवळ, संकेत शिंदे हे तिघेजण मोटरसायकल (क्र.एम.एच. ई 2510) वरून येत होते. यावेळी समोरासमोर दुचाकींची जोराची धडक झाली. यात नितीन तिकुडवे जागीच ठार झाला. तर गंभीर जखमींना कराड येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. भरत पाटील व बबन पडवळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिकेत पाटील व संकेत शिंदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. पोलिसांना घटनास्थळी केक व दारूच्या बाटल्यांचे काचेचे तुकडे आढळून आले आहेत. मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित पाटील, पोलीस कॉन्स्टेबल जाधव घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची फिर्याद पोलीस हवालदार नानासाहेब काका कांबळे यांनी दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करत आहेत.
हेही वाचलंत का ?