लोणंद : वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या संततधार पावसाने धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. वीर धरणाच्या नऊ पैकी तीन दरवाजे उघडले असून १३ हजार क्युसेक्स पाण्याचा निरा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे.
आज सकाळी वीर धरणाचे तीन गेट उघडून ४६३७ क्युसेक्स पाणी निरा नदीच्या पात्रात सोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यामध्ये वाढ करून १३ हजार ९११ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. सध्या वीर धरणाची पाणी पातळी ५७९.३० मीटर झाली आहे. नीरा देवघर, भाटघर व गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने वीर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. धरण ८५ टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येणार असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.