मनोमिलनानंतर सातार्‍यात बंडखोरी उफाळणार (Pudhari File Phoro)
सातारा

Satara Political Rebellion | मनोमिलनानंतर सातार्‍यात बंडखोरी उफाळणार

जागा वाटप फॉर्म्युल्याकडे लक्ष?: इच्छुकांकडून मविआचीही चाचपणी; राजेंसमोर विरोधकांपेक्षा बंडखोरच ठरणार तगडे

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होताच राजकीय समीकरणांना वेग आला आहे. साविआचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे पुन्हा मनोमीलन झाल्याने जागा वाटपाच्या फॉर्म्युला काय असेल? याची उत्सुकता ताणली आहे. मनोमीलनामुळे नवी समीकरणे जुळली असली तरी अनेकांची राजकीय गणिते बिघडली आहेत. मनोमीलनामुळे साविआ आणि नविआमध्ये होणार्‍या जागा वाटपानंतर अनेकांचे पत्ते कट होणार आहेत. त्यामुळे इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू झाली असून मनोमिलनात संधी मिळेल ना मिळेल अशा स्थितीत असलेल्या इच्छुकांनी विरोधी गट असलेल्या मविआकडेही मुलाखती दिल्याने बंडखोरी मोठ्या प्रमाणात उफाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सातारा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवकांच्या 50 जागांसाठी तसेच नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. भापजकडून सोमवारी झालेल्या मुलाखतींना अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाला. 50 नगरसेवकपदांसाठी तब्बल 500 हून अधिक इच्छुकांनी तर नगराध्यक्षपदासाठी 26 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. प्रत्येक प्रभागात अनेक कार्यकर्ते स्वत:ला राजेंचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगत आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले आणि खा. श्री. छ. उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये असले तरी दोघांचेही गट वर्षानुवर्षे स्वतंत्रपणे सातारा विकास आघाडी आणि नगरविकास आघाडीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. यावर्षी होणार्‍या निवडणुकीत खा. उदयनराजे भोसले व ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे मनोमीलन होणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाल्यानंतर सातार्‍याचे राजकारण नव्या वळणावर आले आहे. मनोमिलनानंतर साविआ व नविआमध्ये प्रत्येकी 20 जागा आणि भाजपसाठी देण्यात येणार्‍या 10 जागांमध्ये शिवसेनेच्या शिंदेगटाला 1 जागा देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दोन्ही राजेंचे मनोमीलन झाल्यामुळे साविआ व नविआ या दोन्ही आघाड्यांमधील अनेक इच्छुक कार्यकर्त्यांचे तिकीट कापले जाणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राजे समर्थक इच्छुकांनी भाजपमधील अनिश्चित उमेदवारीमुळे बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. तत्पूर्वी मनोमिलनाचे संकेत मिळताच काही समर्थकांनी महाविकास आघाडीकडे मुलाखतीही दिल्याचे समोर येत आहे. आपल्याला संधी मिळणार नाही, म्हणून स्वतंत्रपणे किंवा मविआच्या पाठिंब्याने लढायचे, अशी भूमिका काही इच्छुकांनी उघडपणे घेतली आहे.

सातारा विकास आघाडी आणि नगरविकास आघाडी यांच्यात समोरासमोर सामना झाला तर एकूण 100 इच्छुकांना संधी देणे दोन्ही राजेंना शक्य आहे. मात्र, भाजपच्या पक्ष श्रेष्ठींकडून कमळावरच लढण्याबाबत सांगण्यात आल्याने मनोमिलनात केवळ 50 इच्छुकांनाच संधी मिळणार आहे. त्यातही युतीचा निर्णय झाल्यास हा आकडा आणखी कमी होवू शकतो. अगोदरच सोमवारी झालेल्या मुलाखतीत भाजपकडून म्हणजेच दोन्ही राजेंकडून 500 इच्छुक मुलाखतीला आले होते. हा आकडा पाहता उमेदवार निवडताना पक्षश्रेष्ठींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यानंतर ज्यांना संधी मिळणार नाही त्यांची मनधरणी करताना नाकीनऊ येणार आहे. अशातच गेल्या दोन-तीन वर्षांपासून ज्यांनी निवडणुकीची तयारी केली आहे त्यांना संधी मिळाली नाही तर ते पर्याय शोधून रिंगणात उतरणार हे निश्चित आहे. त्यामुळे राजेंविरोधात मविआपेक्षा या बंडखोरांचेच तगडे आव्हान राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT