

कराड : नांदलापूर (ता. कराड) येथे पलटी झालेली क्रेन काढण्यासाठी चार तास पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे शनिवारी महामार्गावर पाच कि.मी. लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुसऱ्या चार क्रेनच्या सहाय्याने सकाळी अकरा वाजता क्रेन काढण्यास सुरुवात झाली. दुपारी पावणेतीन वाजता क्रेन बाजूला करून महामार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यात आली. पलटी झालेली क्रेन काढण्यासाठी महामार्ग व डीपी जैन कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली.
सातारा-कोल्हापूर लेनवर नांदलापूरजवळ बुधवारी क्रेनसह कंटेनर पलटी झाला होता. भराव पुलाचे काम एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला ओढ्यावरील पुलाचे काम याच ठिकाणी सुरू असल्यामुळे ही पलटी झालेली क्रेन काढण्यासाठी कसरत करावी लागत होती. त्या ठिकाणी दुसऱ्या क्रेन लावण्यासाठी महामार्गाचा वापर करावा लागत असल्यामुळे महामार्गावरील वाहतूक रोखण्याशिवाय पर्याय नव्हता.
शनिवारी सकाळी अकरा वाजता दुसऱ्या मोठ्या चार क्रेन त्या ठिकाणी दाखल झाल्या. त्यावेळी महामार्गावरील वाहतूक अतिशय धिम्यागतीने सुरू ठेवण्यात आली. दुपारी पावणेतीन वाजता पलटी झालेली क्रेन बाजूला घेतल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत सुमारे चार तास महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती. पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.