सातारा : सातारा पालिकेने प्रशासकीयकाळात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या मोती चौक-शनिवार चौक मार्ग नो हॉकर्स झोन म्हणून जाहीर केला. पालिका प्रशासनाने या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. मात्र, नगरपालिका निवडणूक काळात पुन्हा अतिक्रमणांनी या मार्गाला विळखा घातल्याने पार्किंग तसेच वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील इतर नगराध्यक्षांनी अतिक्रमणांविरोधात कडक भूमिका घेतली असताना साताऱ्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते काय निर्णय घेतात? याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे.
साताऱ्यातील बहुतांश रस्ते अतिक्रमणांमुळे आक्रसले आहेत. विक्रेत्यांनी रस्त्यांवरील फुटपाथ काबीज केल्याने सर्वसामान्य सातारकरांना भर रस्त्यातून जीव मुठीत घेऊन चालावे लागते. अपघात होईल या धास्तीने नागरिकांच्या मनात घर केले आहे. दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत असताना त्याविरोधात कारवाई होत नसल्याने विक्रेत्यांचे फावले आहे.
साताऱ्यातील मोती चौक ते शनिवार चौक हा अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने हा मार्ग ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून जाहीर केला. मोती चौक ते शनिवार चौक या मार्गावर पुन्हा हातगाडे, फळविक्रेते, विविध वस्तू विक्रेते, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, कपड्यांची दुकाने थाटलेली दिसत आहेत. विक्रेत्यांसोबतच या मार्गावरील दुतर्फा असलेल्या दुकानदारांनीही दुकाने बाहेर रस्त्यावर तीन-चार फूट काढल्याने समस्या आणखी वाढली आहे. दुकानदार आणि विक्रेत्यांच्या या अतिक्रमणांमुळे रस्ता अरूंद झाला असून दुचाकी, चारचाकी वाहनांची कोंडी नित्याची बनली आहे. पार्किंगची समस्या गंभीर बनली असून वाहनचालकांना गाड्या लावण्यासाठी जागाच उरलेली नाही. परिणामी, नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, महिला तसेच रूग्णवाहिकांसारख्या अत्यावश्यक वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यातील इतर नगरपालिकांमध्ये मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. काही नगराध्यक्षांनी पद्भार स्वीकारताच अतिक्रमणांविरोधात कडक भूमिका घेत मोहिम सुरू केली. शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि बाजारपेठा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नियमित कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळे तेथे वाहतूक सुरळीत झाली असून नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा शहरात मात्र अतिक्रमणांबाबत ठोस भूमिका न घेतल्याचे चित्र आहे.
सातारा पालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याकडे आता शहराच्या कारभाराची सूत्रे आहेत. नो हॉकर्स झोनचा प्रश्न हा केवळ वाहतुकीचा नसून शिस्त, नियोजन, प्रशासनाची विश्वासार्हता आणि शहराच्या बकालपणाशी जोडला आहे. निवडणुकीपूर्वी अनेक उमेदवारांनी शहर सुशोभिकरण, वाहतूक सुधारणा आणि अतिक्रमणमुक्त सातारा, अशी आश्वासने दिली होती. आता प्रत्यक्षात त्या आश्वासनांची अंमलबजावणी होते का? याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्ष अमोल मोहिते हे प्रशाासकीय काळात घेतलेल्या निर्णयांना कायम ठेवतात की राजकीय दबावापुढे नरमाईची भूमिका घेतात, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. अतिक्रमणांविरोधात कारवाई करताना विक्रेत्यांसाठी पर्यायी झोन, पुनर्वसन किंवा नियोजनबद्ध बाजारेपठ उभारण्याचा पर्यायही महत्त्वाचा आहे.
नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत का? हा सातारकरांचा सवाल आहे. प्रशासनाने घोषित केलेला नो हॉकर्स झोन पुन्हा अतिक्रमणांच्या विळख्यात असेल तर अशा निर्णयांचा अर्थ काय? असा सवाल सातारकर करत आहेत. एकीकडे स्मार्ट सिटी, स्वच्छ सातारा, नियोजित विकासाच्या घोषणा केल्या जातात; मात्र दुसरीकडे मुलभूत शिस्तही टिकवता येत नसेल तर साताऱ्याच्या विकासावर प्रश्न निर्माण होते. मोती चौक ते शनिवार चौक हा मार्ग पुन्हा अतिक्रमणमुक्त होणार की राजकीय सोयीचा बाजार बनणार, याचा फैसला नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर अवलंबून आहे. व्यापाऱ्यांमध्येही याबाबत नाराजी आहे. आम्ही कर भरतो, नियम पाळतो. मात्र, अतिक्रमणांमुळे आमच्या दुकानांसमोर ग्राहकांना उभे रहायलाही जागा मिळत नाही, अशी तक्रार व्यापारी करत आहेत. दुसरीकडे फेरीवाले रोजगाराचा प्रश्न उपिस्थत करून पर्यायी व्यवस्था न करता कारवाई करू नये, अशी भूमिका घेत आहेत. नगरपालिकेने सुचवलेल्या जागी ते व्यवसाय करण्यास तयार नसल्याने तेढ निर्माण होत आहे.