हातगाडे, टपर्‍या हटवल्या नंतर राजवाडा परिसराने मोकळा श्वास घेतला.  Pudhari File Photo
सातारा

सातारा : राजवाड्यालगतचे 23 हातगाडे हटवले

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातार्‍यात अतिक्रमणांमुळे गुदमरलेली ठिकाणे मोकळा श्वास घेऊ लागली आहेत. राजवाड्यालगत असलेले 23 हातगाडे व टपर्‍या हटवण्यात आल्या आहेत. हेरिटेज समितीच्या सूचनेनंतर सातारा पालिकेने ही कारवाई केली. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयालगतची 30 अतिक्रमणे हटवून वडाप थांबा हलवण्यात येणार आहे.

सातारा पालिकेकडून उपाययोजना

सातार्‍याला ऐतिहासिक महत्त्व असून राजवाडा, छत्रपती शिवाजी संग्रहालय, अजिंक्यतारा किल्ला, चारभिंती पाहण्यासाठी शिवप्रेमी नेहमी येत असतात. या वास्तू व ठिकाणांचे महत्त्व आबाधित राहण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सातारा पालिकेकडून त्याद़ृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. अजिंक्यतारा किल्ल्याच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगड येथे अफजलखानाचा कोथळा बाहेर काढलेली वाघनखे सातार्‍यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. ही ऐतिहासिक वाघनखे 10 महिने या संग्रहालयात असतील. त्यामुळे ही वाघनखे पाहण्यासाठी देश-विदेशातून इतिहासप्रेमी, शिवप्रेमी मोठ्या संख्येने सातार्‍यात दाखल होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुरातत्त्व विभाग, हेरिटेज समितीकडूनही या ऐतिहासिक वास्तूंची पाहणी करण्यात येणार आहे. या पाश्वर्र्भूमीवर सातारा पालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.

राजवाडालगतच्या 23 हातगाडे, टपर्‍या हटवण्यात आल्या

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या राजवाड्याचा हेरिटेज वास्तूमध्ये समावेश करण्यात आला आहे. या वास्तूपासून सुमारे 100 मीटर अंतरापर्यंत कोणतीही अतिक्रमणे नसावीत, असे निर्देश आहेत. या वास्तूचे जतन व संवर्धन होण्याच्या द़ृष्टीने पुरातत्त्व विभागाने परिसरातील अतिक्रमणे हटवण्याच्या सूचना पालिकेला केल्या आहेत. त्यामुळे राजवाडालगत असलेले 23 हातगाडे, टपर्‍या हटवण्यात आल्या आहेत. चौपाटी स्थलांतराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखे ठेवण्यात येणार असल्याने या परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचनेनंतर कोरोना काळात येथील अतिक्रमणे काढली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली. सध्या या परिसरात सुमारे 25 ते 30 अतिक्रमणे आहेत. संग्रहालय ते स्टेडियम आणि संग्रहालय ते पारंगे चौक मार्गावरील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. याशिवाय या परिसरातील खासगी वाहतूक थांबाही स्थलांरित करण्यात येणार आहे.

पोवई नाका ते सुभाषचंद्र बोस चौक दरम्यानचाही सर्व्हे

अतिक्रमणांमुळे सातारा तहसील कार्यालयासमोर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. बसस्थानकासमोरही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे पोवईनाका (सभापती निवास) ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौकापर्यंत मुख्य मार्गावरील दोन्ही बाजूला असलेल्या अतिक्रमणांचा सर्व्हे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिस आणि नगरपालिका यांच्याकडून लवकरच संयुक्तिक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित विक्रेत्यांनी स्वत:हून तातडीने अतिक्रमणे हटवावीत, असे आवाहन अतिक्रमण हटाव विभागाने केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT