सातारा : आईचा खून केल्याप्रकरणी मोराळे, ता. खटाव येथील आरोपी किरण शहाजी शिंदे (वय ३२) याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. कोले यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली आहे. लग्न लावून देत नसल्याने किरणने आईचा जीव घेतला होता.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दि. ११ डिसेंबर २०१९ रोजी संशयित किरण शिंदे याने आई कांताबाई शहाजी शिंदे हिच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला होता. याची फिर्याद शहाजी बाबुराव शिंदे यांनी वडूज पोलिस ठाण्यात दिली होती. माझ्यापेक्षा कमी वयाच्या मुलांची लग्न झाली असून माझे लग्न का करत नाहीस या कारणावरून किरण याने रात्री घरात घुसून वडील शहाजी शिंदे यांना लाथा मारून घराच्या बाहेर काढले. तसेच घराला आतून कडी लावून आई कांताबाई यांना शिवीगाळ करून कुऱ्हाडीने डोक्यात घाव घातले. यामध्ये कांताबाई यांचा मृत्यू झाला.
वडूज पोलिसांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय वडूज येथे दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील अजित कदम यांनी सरकार पक्षाच्यावतीने दहा सक्षीदार तपासले. साक्षीदारांचे जाबजबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. कोले यांनी किरणला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. हा खटला चालवणे कामी वडूज पोलिस ठाण्याचे पोनि घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, हवालदार विजयालक्ष्मी दडस, सागर सजगणे, अमीर शिकलगार, जयवंत शिंदे यांनी सहकार्य केले.