सातारा: जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू झालेली थंडी आता चांगलीच वाढू लागली आहे. विशेषत: मागील दोन दिवसांपासून सकाळ-संध्याकाळ हवेत गारठा जाणवत असून थंडीचा कडाका वाढला आहे. सातारा शहर आणि महाबळेश्वर या दोन्ही ठिकाणचा पारा तब्बल 12 अंशांपर्यंत घसरल्याने नागरिकांना हुडहुडी भरवत आहे. हिवाळ्याची ही अचानक वाढलेली तीव्रता सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागली आहे.
यंदाच्या हंगामात नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच उष्णतेची लाट जाणवत होती. हवामान उबदार असल्यामुळे थंडीचा मागमूसही नव्हता. मात्र कार्तिकी पौर्णिमेनंतर हवेत अचानक बदल झाला आणि जिल्ह्यात गुलाबी थंडी जाणवू लागली. आठवडाभरापासून हा गारवा अधिक वाढत गेला आणि अलीकडील दोन दिवसांत तर तापमानात मोठी घसरण झाली. विशेषत: महाबळेश्वरला ‘मिनी काश्मीर’ म्हटले जाते, आणि त्या नावाला साजेशी थंडी सध्या तिथे जाणवत आहे.
थंडी वाढू लागल्याने नागरिकांनी आता शेकोट्यांचा आधार घेतला आहे. ग्रामीण भागासह शहरातील गल्ल्या, चौक, वसाहती परिसरात रात्रीच्या वेळी शेकोट्यांची ऊब घेणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. घराबाहेर पडताना स्वेटर, मफलर, जॅकेट यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसत आहे. सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्याही वाढली असली तरी गारठा चांगलाच जाणवत असून अनेक जण चालताना चेहऱ्यावर मफलर किंवा कॅप लावून बाहेर पडू लागले आहेत.
अचानक वाढलेल्या थंडीचा सर्वाधिक परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांनी त्रस्त होणाऱ्यांची संख्या वाढली असून शहरातील क्लिनिक, दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. लहान मुलांमध्ये आणि वयोवृद्धांमध्ये सर्दी-खोकल्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. डॉक्टरांनी नागरिकांना उबदार कपडे वापरणे, गरम पाणी पिणे, तसेच अचानक थंड वाऱ्यात जास्त वेळ राहू नये असे आवाहन केले आहे.
शनिवारी सातारा आणि महाबळेश्वर येथे किमान तापमान १२ अंशांपर्यंत नोंदले गेले, जे हिवाळ्याच्या सुरुवातीला चिंताजनक मानले जात आहे. पुढील काही दिवस तापमान आणखी घसरू शकते असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
सकाळच्या शाळेसाठी बाहेर पडणाऱ्या चिमुकल्यांसाठी ही थंडी अधिक त्रासदायक ठरत आहे. अनेक लहान मुले स्वेटर, टोपी, हातमोजे घालूनच सकाळी बाहेर पडताना दिसत आहेत. त्यांना शाळेत सोडणाऱ्या पालकांनाही गारठ्यामुळे कुडकुडत प्रवास करावा लागत आहे.
शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही थंडीची तीव्रता जाणवत आहे. शेतांमध्ये पहाटे दवबिंदू खाली पडताना दिसत आहेत. शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी सकाळच्या सिंचनाचे वेळापत्रक बदलू लागले आहे, तर पशुपालकांनी जनावरांसाठी उबदार जागा तयार केल्या आहेत.
हिवाळ्याची सुरुवात असूनही तापमानात एवढी मोठी घसरण झाल्याने नागरिकांनी आता आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे. हवामानातील बदलामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे गरम पेय, सूप, उबदार कपडे आणि योग्य आहार घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.