

सातारा : साधारण आठवडाभरापासून जिल्ह्याला थंडीची चाहूल लागली आहे; मात्र मागील दोन दिवसांपासून हवेत गारठा वाढला आहे. शनिवारी मिनी काश्मीर असलेले महाबळेश्वर अन् साताऱ्याचा पारा 12 अंशांपर्यंत खाली आल्याने हुडहुडी वाढली आहे. थंडीच्या कडाक्यापासून संरक्षणासाठी शहरासह ग्रामीण भागातही शेकोट्या पेटू लागल्या आहेत. यावर्षी नोव्हेंबरच्या प्रारंभीदेखील थंडीचा मागमूस नव्हता; मात्र आठवडाभरापासून अचानक थंडी पडू लागली. वातावरणातील या बदलाने सर्दी व खोकल्याचे आजार बळावले आहेत. निरोगी आरोग्यासाठी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची गर्दीही सातारा शहर व परिसरातील रस्त्यांवर दिसू लागली आहे.
यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे कार्तिकी पौर्णिमेनंतर जिल्ह्याला गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. अवघ्या काहीच दिवसांमध्ये थंडीची तीव्रता वाढू लागली असून गेल्या दोन दिवसांपासून पहाटेच्या वेळी थंडीने हुडहुडी भरत आहे. दरम्यान, शनिवारी सातारा व महाबळेश्वरचे किमान तापमान 12 अंशांपर्यंत नोंदवण्यात आले. हिवाळ्याच्या सुरुवातीलाच तापमान खाली आल्याने जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे.
अचानक वातावरणातील हा बदल अनेकांच्या आरोग्यासाठी पचनी पडला नसल्याने सर्दी, खोकल्यासारखे आजार बळावले आहेत. शहरासह ग्रामीण भागातील दवाखान्यांमध्ये सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. थंडीचा कडाका वाढल्याने शनिवारी सकाळच्या शाळेला जाणाऱ्या चिमुकल्यांना व त्यांना सोडणाऱ्या पालकांनाही कुडकुडत घराबाहेर पडावे लागत आहे.
अचानक थंडीचा कडाका वाढल्याने कष्टकरी वर्ग गारठत आहे. थंडीच्या कडाक्यातही खंड न पाडता दैनंदिन कामे करताना त्यांना कसरत करावी लागत असून हिवाळा संपेपर्यंत ती कायम राहणार आहे. रात्रपाळीत काम करणारे कर्मचारी, पेपर विक्रेता, हमाल यांना वाढत्या थंडीचा सर्वाधिक सामना करावा लागत आहे. पेपर विक्रेत्यांना पहाटे पेपरचे पार्सल ताब्यात घ्यावे लागते व सकाळी लवकरच ते पेपर वाटावे लागतात. हे वितरक कडाक्याच्या थंडीत शेकोटीची उब घेऊन मग पुढे मार्गस्थ होत आहेत. बसस्थानक परिसर, शहरातील मुख्य चौक, महामार्गालगतचे थांबे आदी ठिकाणी शेकोटीबरोबरच गरम चहाचाही अस्वाद घेत आहेत.