हनी ट्रॅपप्रकरणी सातारा पोलिसांनी संशयितांना (बुरखाधारी) अटक केली.  (Pudhari File Photo)
सातारा

Honeytrap Gang Busted | हनी ट्रॅपप्रकरणातील टोळीचा पर्दाफाश

Five Arrested Satara | पाच जणांना अटक : सातार्‍यातील घटनेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा शहरातील कोडोली येथे पाच दिवसांपूर्वी वृध्द निवृत्त नायब तहसीलदार यांना लुटण्याचा बनाव करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले असून शहर पोलिसांनी हनी ट्रॅपप्रकरणी पाच जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला. पाच संशयितांमध्ये तीन महिलांंचा समावेश आहे. दरम्यान, सातारसारख्या शहरात अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

राजेंद्र भगवान मोहिते (वय 45, कोरेगाव), संजय धनाजी भिसे (वय 34, रा. कोरेगाव), शिला विमलेश विश्वकर्मा (वय 42, रा. देगाव फाटा,सातारा), लक्ष्मी शिवाजी भोसले (वय 53, रा. कोरेगाव), रंजना नामदेव चव्हाण (वय 67, रा. कोरेगाव) यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून निवृत्त झालेल्या नायब तहसीलदार यांनी याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, हनी ट्रॅपची मूळ घटना दि. 17 जुलै रोजी घडली आहे. तक्रारदार वृध्द निवृत्त अधिकारी हे त्यादिवशी दुपारी 2 वाजता या टोळीतील एका महिलेला भेटायला कोडोली येथील घरी गेले होते. वृध्द व ती महिला घरी असतानाच त्यावेळी संशयित टोळीपैकी दोघेजण तेथे आले. संशयितांनी वृध्दाचे व महिलेचे शुटींग व फोटो काढण्यास सुरुवात केली. तसेच महिलेला व वृध्दाला दमदाटी करून एकत्रित फोटो दाखवून बदनामी करण्याची भिती दाखवली. याचवेळी संशयित दोघांनी वृध्दाच्या गळ्यातील सोन्याची चैन, दोन अंगठ्या तसेच महिलेचे गळ्यातील मंगळसूत्र व कानातील असे त्यांनी त्यांच्याकडून काढून घेवून ते पळून गेले. याबाबतची तक्रार दि. 19 जुलै रोजी दाखल करण्यात आली.

घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा शहर पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण विभागाने (डीबी) घटनास्थळी भेट देवून सर्व माहिती घेतली. यावेळी पोलिसांनी तक्रारदार वृध्दासोबत असलेल्या महिलेकडे चौकशी केली. चौकशी करीत असताना संबंधित महिला पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत नसल्याने तिच्यावरील संशय बळावला. यामुळे पोलिसांनी त्या महिलेची अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली.

यावेळी संबंधित महिलेनेच तक्रारदार निवृत्त वृध्द अधिकारी यांचा विश्वास संपादन करून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.

पोलिसांनी महिलेकडे अधिक चौकशीला सुरुवात केल्यानंतर मात्र तिने इतर दोन महिला व आणखी दोघांनी मिळून हा प्लॅन करत लुटमार केल्याची कबुली दिली. याबाबतची शंका येवू नये यासाठी घटनेदिवशीच महिलेच्या गळ्यातील सोनेही लुटण्यात आल्याचा बनाव करण्यात आला. पोलिसांनी सर्वांची धरपकड केल्यानंतर पोलिसांनी सोन्याचा ऐवज गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शामराव काळे, फौजदार सुधीर मोरे, विजय शेलार, पोलिस सुजीत भोसले, निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, पंकज मोहिते, सुशांत कदम, तुषार भोसले, सचिन रिटे, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम यांनी कारवाईत सहभाग घेतला.

उत्कंठा वाढवणारा तपास

दि. 17 रोजी घडलेल्या या घटनेनंतर सातारा शहर पोलिस तपासाला लागले. ज्येष्ठ नागरिक असल्याने अधिक बारकाव्याने तपासाला सुरुवात केली. संबंधित महिलेकडे चौकशी करत असताना पोलिसांना उत्कंठा वाढवणारा तपास करावा लागला. ही लुटमार कमी मात्र भानगड अधिक असल्याचा संशय बळावला. यातूनच हनी ट्रॅप सारखा प्रकार समोर आला. तसा हा गुन्हा क्लिष्ट व बनाव केलेला असताना देखील सातारा शहर पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT