सातार्‍यात डीजे, लेझर चालकांवर गुन्ह्यांची मालिका File Photo
सातारा

Ganesh Chaturthi | सातार्‍यात डीजे, लेझर चालकांवर गुन्ह्यांची मालिका

पोलिसांची खमक्या भूमिका : आवाज कमी पण, डोळ्यांचा त्रास वाढला

पुढारी वृत्तसेवा

विठ्ठल हेंद्रे

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात डीजे सध्या ‘दोरीत’ असल्याने कानांचा बंदोबस्त होतोय. मात्र, लेझर बिम लाईटमुळे सातारकरांच्या डोळ्यांचा त्रास वाढू लागला आहे. यावर पोलिसांनी डीजे, लेझर बिम लाईट चालकांवर गुन्हे दाखल करण्याची मालिकाच सुरु केली आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांनी डीजे बंदीला कडाडून विरोध केल्याने त्यांना पाठींबा वाढत आहे.

जिल्ह्यात सणांच्या उत्साहाला आनंदाचे आवतान आले असले तरी डीजे, लेझर बिम लाईटमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवू लागले आहे. आगमन सोहळा, प्रचंड वाहतूक कोंडी अशात डीजेचा दणदणाट व लाईटिंगचा झगमगाट असे वास्तव आहे. गेल्या एक महिन्यांपासून पोलिस प्रशासनाने गणपती मंडळांच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठका घेवून आगमन मिरवणूक, विसर्जन मिरवणूकीमध्ये डीजेचा आव्वाज वाढल्यास व डोळ्यांना लाईटिंगचा त्रास झाल्यास कोणालाही सुट्टी देणार नसल्याचा इशारा दिला. पोलिस एकीकडे खमकी भूमिका घेत असताना त्याला सातार्‍यातील ज्येष्ठ नगरिकांनी स्वागतार्ह भूमिका घेतली. दुर्देवाने मात्र लोकप्रतिनिधींकडून कार्यकर्ते दुखावणार नाहीत, अशी डबल ढोलकीची भूमिका घेतली.

सातारा जिल्ह्यात पोलिसांकडून बैठकींचा धडाका सुरु असतानाच आता संचलनाचा धमाका सुरु आहे. सण, उत्सव आनंदात पण आरोग्यावर गंभीर परिणाम होणार नाहीत यासाठी पोलिस, सजग नागरिक, प्रसिध्दीमाध्यमे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. दणदणाट झाला झगमगाट वाढला तर पोलिस काय भूमिका घेणार? याकडे लक्ष होते. मात्र, पोलिस मागे हटले नाहीत. गेल्या चार दिवसांमध्ये शहर पोलिस ठाणे व शाहूपुरी पोलिस ठाण्यात डीजे व 3 लाईटिंग चालकांवर गुन्हे दाखल करुन आपले इरादे स्पष्ट केले आहेत. दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांनी भरपावसात डीजे विरोधात रॅली काढून तसेच महाआरती करुन चळवळ उघडली असताना त्यालाही भरभरुन पाठींबा वाढत आहे. सातार्‍यात यंदा डीजे दणाणणार अशीच सुरुवातीला परिस्थिती होती. तसे झालेही आगमन मिरवणुकीत डीजे वाजला. यावर पोलिसांनी त त्काळ गुन्हा दाखल केला.

यामुळे आतापर्यंतच्या आगमन मिरवणूकीत डीजेचा आवाज मर्यादित राहिला आहे. सध्या हा आवाज मर्यादेत असला तरी विसर्जन मिरवणूकीत काय होणार? याकडे लक्ष लागले आहे. कारण सर्वच्या सर्व डीजेंचे बुकींग झालेले आहे.

पोलिसांकडून सुट्टी नॉट

सातार्‍यातील डीजे व डोळ्याला इजा होईल अशा लाईटिंगचे स्तोम वाढल्याने पोलिसांनी खमकी भूमिका घेतली आहे. थेट गुन्हे दाखल करण्याचे अस्त्र बाहेर काढल्याने डीजे चालक, लेझर बिम चालकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. आम्ही डीजे मर्यादेच्या आवाजात लावल्यानंतर मंडळातील कार्यकर्ते आवाज वाढवण्यास सांगतात. तसे नाही झाल्यास डीजे, लाईटिंगचे पैसे देणार नसल्याचे सांगतात. यामुळे पर्याय राहत नसल्याचे डीजे, लाईटिंग व्यवसायिकांचे म्हणणे येते. डीजेचा आवाज वाढल्यास व डोळ्याला त्रास होणार्‍या लाईटिंग दिसल्यास आम्ही सुट्टी देणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT