सातारा : ‘ज्या ज्या सहकारी बँकांमध्ये राजकारण आले, त्या बँका मोडकळीस आल्या आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या हितासाठी झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येकाने राजकारणाचे जोडे बँकेच्या बाहेर ठेवावेत आणि बँकेच्या मूळ उद्देशापासून दूर जाऊ नये,’ अशा शब्दांत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी गृहनिर्माण मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांच्याकडे त्यांनी अर्ज सादर केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती सुनील काटकर, काका धुमाळ, लक्ष्मण कडव, नाना शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उदयनराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘जिल्हा बँकेची मूळ संकल्पना शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या हिताची जपणूक करणे ही आहे. राज्यातील कोणताही जिल्हा घेतला तरी ज्या सहकारी बँकांमध्ये राजकारणाचा हस्तक्षेप वाढला, त्या बँका अडचणीत आल्याचे दिसून येते. सुदैवाने सातारा जिल्हा बँकेने कष्टकरी वर्गाचे हित जपल्याने देशपातळीवर या बँकेचे नाव आदराने घेतले जाते.’
जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या सर्वांनी शेतकरी-कष्टकरी वर्गाचे हित डोळ्यासमोर ठेवावे, असे आवाहन करत उदयनराजे म्हणाले, ‘मी शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या वतीने हे मत मांडत आहे. निवडणूक लढविणाऱ्यांनी राजकारणाचे जोडे बँकेच्या बाहेर ठेवावेत. बँकेच्या स्थापनेच्या मूळ उद्देशापासून वेगळा विचार करता कामा नये.’
शेतकरी व कष्टकरी वर्गानेच आमदार आणि खासदारांना मतदान करून निवडून दिले आहे. त्यामुळे या वर्गाच्या हिताची जपणूक करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे, असेही उदयनराजे यांनी स्पष्ट केले. ‘ज्यांनी आपल्याला निवडून दिले, त्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे काम आमदार-खासदारांनी केले पाहिजे. जिल्हा बँकेची स्थापना ज्या उद्देशाने झाली, तो उद्देश साध्य झाला पाहिजे,’ असेही त्यांनी सांगितले.