सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शाहूनगर, गोडोली, सदरबझार, तामनाजाईनगर, शाहूपुरी, करंजे परिसरात कमी दाबाने, अवेळी, अपुरा पाणीपुरवठा होत आहे. जलवाहिनीला झालेल्या लिकेजमध्ये सांडपाणी जावून नागरिक आजारी पडत आहेत. मात्र या तक्रारी करूनही कार्यकारी अभियंता अजित वाघमारे व त्यांचे अभियंते दुर्लक्ष करतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात लिकेज काढण्यासाठी तसेच बिल्डर्सकडून पैसे घेऊन निवासी पाणी वापराच्या मुख्य जलवाहिनीवरून नळकनेक्शन्स दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप नगरसेवकांनी केला. दरम्यान, या बैठकीत कोणताच ठोस निर्णय न झाल्याने नगराध्यक्ष अमोल मोहितेंनी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली.
सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाचे अभियंते तसेच संबंधित नगरसेवकांची पाणी वितरणातील विस्कळीतपणाबाबत बैठक पार पडली. या बैठकीस मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगरसेवक अविनाश कदम, फिरोज पठाण, हेमलता भोसले, शंकर किर्दत, भारती सोलंकी आदि उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीलाच शाहूनगर, गोडोली, विलासपूर परिसरातील नगरसेवकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गलथान कारभाराचा पाढा वाचला. नगरसेवक अविनाश कदम म्हणाले, प्राधिकरणाकडून नागरिकांना महिन्याची महिन्याला भरमसाठ बिले दिली जातात. मात्र नागरिकांना वेळेवर, पुरेसे पाणी दिले जात नाहीत. पाणीपुरवठा झाला नाही म्हणून प्राधिकरण नागरिकांना पाणीबिलात सवलत देते का? जलवाहिन्यांची कामे रखडवत ठेवल्याने नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. दरे खुर्द येथील पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण असून त्याठिकाणी नळकनेक्शनला मीटर बसवलेले नाहीत. ही योजना अद्याप नगरपालिकेकडे हस्तांतर झालेली नसताना बिले कशी काय दिली जातात? असा सवाल करत अविनाश कदम यांनी अभियंत्यांना धारेवर धरले. पंधरा दिवसात परिसराचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास प्राधिकरणाला टाळे ठोकणार, असा इशाराही कदम यांनी दिला.
फिरोज पठाण म्हणाले, शाहूनगर, गोळीबार मैदान परिसर, विलासपूर भागात महिनोन्महिने पाणीपुरवठा विस्कळीत असतो. या परिसरात अडीच हजाराहून अधिक पाणी टँकरच्या खेपा स्वखर्चाने दिल्या आहेत. तक्रारी करुनही कार्यकारी अभियंता दखल घेत नाहीत. संबंधित अभियंत्यांचे फोन बंद असतात. बऱ्याच ठिकाणी लिकेजमुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे सांगत पठाण यांनी दूषित पाण्याने भरलेला जार अभियंत्यांच्या टेबलवर ठेवला. खा. उदयनराजे व ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या बैठकीलाही कार्यकारी अभियंता जाणीवपूर्वक गैरहजर राहिले. पगार झाला नाही म्हणून तुमचे कर्मचारी पाणी न सोडता नागरिकांना वेठीस धरणार का? असा संतप्त सवाल पठाण यांनी केला.
गोडोली, पिरवाडी, सदरबझार, करंजे, तामजाईनगर, शाहूपुरी परिसरात कमी दाबाने, कमी वेळ, अवेळी, अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने संबंधित नगरसेवकांनी प्राधिकरणाच्या अभियंत्यांवर आगपाखड केली. अनेक ठिकाणी जलवाहिनीला लिकेज आहे. पाण्याच्या टाक्या भरुनही लगेच रिकाम्या होतात. नळाला पुरेसे पाणी येत नसताना बिले मात्र भरमसाठ व अंदाजे आकारली जातात. नळकनेक्शन दिले मात्र अनेक महिन्यांनी बिले दिली जात असल्यामुळे भरमसाठ आलेले बिल भरण्यास नागरिकांना अडचणी येत आहेत. करंजे-म्हसवे रोड परिसरात प्राधिकरणाची कामे रखडलेली व अपूर्ण आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा होत नसल्याने गैरसोय होत आहे. नागरिक विचारणा करत असताना प्राधिकरणाकडून प्रतिसाद मिळत नाही. लिकेज काढण्याची जबाबदारी प्राधिकरणाची आहे. त्यासाठी टेंडर काढून ठेकेदार नेमले असतानाही नागरिकांकडून पैसे घेतले जातात. नागरी भागासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली आहे. अपार्टमेंटला पाणीकनेक्शन देताना अशा जलवाहिनीवरून न देता त्यासाठी मुख्य जलवाहिनीवरून स्वतंत्र जलवाहिनी टाकणे आवश्यक आहे. मात्र प्राधिकरणातील अभियंते पैसे घेऊन नागरी भागासाठी दिलेल्या दोन किंवा तीन इंची जलवाहिनीवरुनच कनेक्शन देतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांचा रोष पत्करावा लागत असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. अजंठा चौक, कामाठीपुरा येथे लिकेज झाल्याने जलवाहिनीत सांडपाणी मिसळत आहे. शिवतीर्थ येथे पाणीपुरवठा पुन्हा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली. दरम्यान, या बैठकीत संबंधित अभियंत्यांनी पुन्हा बघू, करू अशी गोलगोल उत्तरे दिली. प्राधिकरणाचे जंगम, निकम, गडकरी हे अधिकारी गृहपाठ करुन न आल्याने कोणताच ठोस निर्णय झाला नाही. नगरसेवकांनी केलेले प्रश्न, त्यांनी सुचवलेल्या समस्यांचे निराकरण न झाल्याने मंगळवारी पुन्हा बैठक घेण्यात येईल, असे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी सांगितले. त्यामुळे ठोस निर्णयाविना ही बैठक निष्फळ ठरली.
नगरसेवकांना बैठकीचे निरोपच नाहीत
सातारा पालिकेत नगराध्यक्षांनी प्राधिकरणाच्या अभियंत्यांसोबत बोलावलेल्या बैठकीचे निरोप अनेक नगरसेवकांना दिले गेले नाहीत. त्यामुळे बरेच नगरसेवक या महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे संबंधित भागातील पाणीपुरवठ्याचे प्रश्न अनुत्तरित राहिले. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. बैठकीच्या ढिसाळ नियोजनाबद्दल संबंधित नगरसेवकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.