सातारा : पालिका निवडणुकीच्या मतदानाला जिल्ह्यातील सातारा, म्हसवडमध्ये गालबोट लागले. अनेक ठिकाणी धुसफूस होऊन राडा झाला. एकमेकांची गचांडी धरल्यानंतर हाणामारीपर्यंत विषय गेला. अनेक केंद्रांवर दोन्ही गटांचे कार्यकर्ते भिडले. त्यांच्यामध्ये जोरदार तणातणीही झाली. त्यामुळे सातार्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्यांनी निवडणुकीवर आक्षेप घेत तब्बल 3 तास सातारा शहर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. म्हसवडमध्ये सोमवारी रात्री झालेल्या राड्यामुळे तेथे मंगळवारी तणावसद़ृश वातावरणात मतदान झाले.
सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, वाई, रहिमतपूर, म्हसवड, पाचगणी, मलकापूर या पालिकांसाठी, तर मेढा नगरपंचायतीसाठी मंगळवारी मतदान झाले. तब्बल 8 वर्षांनंतर या पालिका निवडणुका होत असल्याने कार्यकर्ते, उमेदवार यांच्यामध्ये उत्साह होता. निवडणुका होत असताना कुठे गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तरीही अनेक ठिकाणी ईर्ष्या होत राहिल्याने कार्यकर्ते आमने-सामने आले. सातार्यात प्रामुख्याने रिमांड होम परिसर, गुरुवार पेठ व पिरवाडी येथे तणातणी झाली. रिमांड होम परिसर हा प्रभाग 5 मध्ये येतो.
याठिकाणी भाजपचे उमेदवार विजय देसाई व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निलेश मोरे यांच्यात तगडी फाईट होत आहे. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास निलेश मोरे यांचे मित्र व सामाजिक कार्यकर्ते महेश शिवदास हे रिमांड होम परिसरात थांबले होते. त्यावेळी भाजप कार्यकर्ते हे उमेदवारांना स्लीप देत होते. त्या स्लीपवर कमळ चिन्ह होते. मतदारांकडून ही स्लीप आत बूथमध्ये नेली जात होती. यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आक्षेप शिवदास यांनी घेतला. यातून रिमांड होम परिसरात भाजप व शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यातून कार्यकर्त्यांची धराधरी होवून शिव्यांची अक्षरश: लाखोली वाहण्यात आली. मोठा जमाव जमल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
रिमांड होम परिसरातील ही बाब पोलिसांना समजल्यानंतर त्याठिकाणी अधिक पोलिसांची कुमक पाठवण्यात आली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपवर आक्षेप घेतला. शिवसेना उमेदवार निलेश मोरे व तक्रारदार महेश शिवदास यांनी सातारा शहर पोलिस ठाणे गाठले. पोलिस तक्रार दाखल करुन घेत नसल्याने अखेर शिवसेना पदाधिकार्यांनी शहर पोलिस ठाण्यासमोर 1 वाजता ठिय्या मांडला. सामाजिक कार्यकर्ते व निलेश मोरे यांचे बंधू सुशांत मोरे हेही शहर पोलिस ठाण्याबाहेर आले. यामुळे शहर पोलिस ठाण्यासमोर तणाव निर्माण झाला. जोपर्यंत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा पवित्रा घेतला. अखेर महेश शिवदास यांची पोलिसांनी तक्रार घेण्यास सुरुवात केली. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांचे पती नरेंद्र पाटील यांनीही मोरे यांची भेट घेवून सोबत असल्याचे सांगितले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना 4 वाजता शिवसेना पदाधिकार्यांनी ठिय्या आंदोलन थांबवले. तसेच तक्रार कायम असल्याचे सांगून प्रभाग मधील निवडणूकीबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचेही सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सांगितले.
मतदान संपत असताना गोडोलीत दांडक्याने एकमेकांना मारहाण करत तुफान बडवाबडवी झाली. यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दुसर्या पार्टीमधून का फिरतो? या कारणातून एका गटाने हल्ला केला. यामुळे गोडोलीत तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, संशयितांवर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी, अशी मागणी उमेदवार शेखर मोरे यांनी पोलिस ठाण्यासमोर येवून केली.
दरम्यान, म्हसवड नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या आदल्या रात्री भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये पोलिसांसमोरच तुफान राडा झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे मतदानाच्या दिवशी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
करंजे, सदर बझार, गोडोली, गुरुवार पेठ, मंगळवार पेठेतील काही प्रभागांमध्ये दिवसभर तणावाचे वातावरण होते. प्रभाग क्र. 3, 5, 18, 21 आणि 23 मध्ये वेगवेगळ्या कारणांवरून तुफान राडा झाला. हाणामारी, बाचाबाचीमुळे वातावरण तंग झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे वातावरण निवळले; मात्र या घटनेनंतरही परिसरात कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरूच होती. प्रभाग 5 मध्ये देसाई आणि मोरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे व निलेश मोरे यांनी दखल घेतली जात नसल्याने शहर पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन केले. प्रभाग क्र. 18 मध्ये शेखर मोरे आणि विनोद मोरे यांचे कार्यकर्ते भिडले. प्रभाग क्र. 21 मध्ये अशोक मोने आणि सागर पावशे यांच्या कार्यकर्त्यांमध्येही हाणामारी झाली. प्रभाग क्र. 23 मध्ये लेवेंच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. काही मतदान केंद्रांवर फ्री स्टाईल हाणामारी झाली. त्यामुळे सातार्यात दिवसभर तणाव दिसत होता.