सातारा : सातार्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून दोन तोळ्याचे मंगळसूत्र लांबवले. यावेळी महिलेने प्रतिकार केल्यावर तिला ढकलून देत जखमी केले. ही घटना सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास फॉरेस्ट कॉलनीमध्ये घडली. या थरारक घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सौ. वंदना प्रशांत शिंगटे (वय 47, रा. फॉरेस्ट कॉलनी, विलासपूर, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वंदना शिंगटे या कॉलनीतील महिलेसोबत मॉर्निंग वॉक झाल्यानंतर घराकडे जात होत्या. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तीन युवकांनी वंदना शिंगटे यांचे 2 तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावले.
प्राथमिक माहितीनुसार, चोरटे तोंडाला स्कार्फ बांधून विना क्रमांकाची दुचाकीवरुन आले होते. त्यामुळे महिलांनी चोरट्यांचे आठवेल तसे वर्णन पोलिसांना सांगितले.
अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे घाबरलेल्या महिलांनी चोरट्यांला प्रतिकाराचा प्रयत्न केला. मात्र एका चोरट्याने कोयत्यासारखे धारदार शस्त्र काढून त्यांना धमकावले आणि दुचाकीवरुन पलायन केले. अवघ्या दोन मिनिटांमध्ये ही थरारक घटना घडली. आरडाओरडा झाल्यानंतर नागरिक जमले. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु आहे.