सारखळ अंतर्गत असलेल्या दत्तनगर वस्तीमधील रस्त्याची चिखलाच्या राडारोड्याने बिकट अवस्था झाली आहे.  (Pudhari File Photo)
सातारा

Farmers Road Issues | सारखळ ते हनुमाननगर रस्त्यावर सांडपाणी, चिखल

Dattanagar sewage problem | दत्तनगर वस्तीवरील रहिवाशांचे हाल : शेतकरी, विद्यार्थीही त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

कण्हेर : सारखळ येथील दत्तनगर वस्तीतून जाणारा मुख्य रस्ता सांडपाणी व चिखलामुळे अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. या रस्त्याची शासकीय नकाशावर नोंद असूनही थोड्या सुधारणा देखील न होत असल्यामुळे येथील रहिवाशांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. दत्तनगर वस्तीमधील या रस्त्याचे शेतशिवार, शाळा आणि इंगळेवाडी, गवडी, नुने अशा विविध गावांकडे प्रवासासाठी विशेष महत्त्व आहे; परंतु सध्याची त्याची अवस्था बिकट असून नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.

या रस्त्यानजीक काही स्थानिकांनी घरांचे बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. घरांचे सांडपाणी रस्त्यावरच वाहात असल्याने परिसरात अस्वच्छतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. परिसरातील लोकांना पायाभूत सुविधांचा अभाव भासत असून, दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

विशेष म्हणजे, शाळेतील विद्यार्थी आणि शेतकरी वर्ग यांना या रस्त्याचा रोजचा वापर होत असून, विद्यार्थ्यांची वर्दळ कायम असते. मात्र, चिखल, राडारोडा आणि सांडपाणी यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच गैरसोय होत आहे. तसेच, हनुमाननगर लगतच्या ओढ्यावर मोठ्या पुलाचीही आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासते. चालू दूरवस्थेमुळे या रस्त्याचा प्रत्यक्ष फायदा न होता उलट लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या परिस्थितीत तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून, अतिक्रमण आणि सांडपाणी समस्येवर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

  • दत्तनगर रस्त्याची सांडपाणी व चिखलामुळे दयनीय अवस्था

  • स्थानिकांच्या अतिक्रमणामुळे आणि सांडपाणी निचर्‍याच्या समस्येमुळे परिसरात अस्वच्छता

  • विद्यार्थ्यांना व शेतकर्‍यांना रोजच्या परगावी जाण्या-येण्यास मोठा त्रास

  • रस्त्यावर मोठा पूल नसल्याने रहिवाशांची गैरसोय वाढली

  • सारखळ अंतर्गत असलेल्या दत्तनगर वस्तीमधील रस्त्याची चिखलाच्या राडारोड्याने बिकट अवस्था झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT