

कण्हेर : कण्हेर (ता. सातारा) येथील धरणात कुटुंबीयांसमवेत फिरावयास गेलेल्या चिमुकलीचा बुडून मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. आराध्या अवधूत कोरडे (वय 10, रा. इस्लामपूर, जि. सांगली) असे या मुलीचे नाव आहे.
मामाच्या गावी फिरण्यास आल्यानंतर काळाने या मुलीवर घाला घातला. धरणावर पोहण्यासाठी आलेल्या परिसरातील युवकांनी तिला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु तिचा बुडून दुर्दैवी अंत झाला. याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आराध्या आई, मावशी, मामा व मामी सोबत कण्हेर धरणावर फिरावयास गेली होती. धरणाकाठी खेळता खेळता अचानक तोल जाऊन ती पाण्यात बुडाली. कुटुंबीयांनी आरडाओरडा करत मदतीची हाक दिली.
यानंतर नजीकच पोहणार्या युवकांनी तिला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, त्यापूर्वीच ती खोल जलाशयात बुडाली होती. युवकांनी शोधाशोध करून आराध्याला पाण्याबाहेर काढल्यावर कुटुंबीयांनी तातडीने उपचारासाठी तिला रूग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
आराध्या ही मूळची इस्लामपूरची असून ती इयत्ता चौथीमध्ये शिकत होती. शाळेस उन्हाळी सुट्ट्या लागल्याने ती कोंडवे ता. सातारा येथे मामाच्या गावी आलेली होती. लहान वयातच तिची झालेली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तिचे वडील एसटी ड्रायव्हर आहेत.