Sahyadri Tiger Project affected people returned from Thane
सातारा : पुढारी वृत्तसेवा
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बाधित झालेले जावळी तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी, खिरखंडी, कुसापूर, तांबी, वासोटा येथील प्रकल्पग्रस्त आपल्या मूळ ठिकाणी पुन्हा येऊन दाखल झाले आहेत. कोअर झोनमधील क्षेत्रातच त्यांनी ठाण मांडून संसार थाटला आहे.
भिवंडी तालुक्यातील एकसळ सागाव येथे झालेले पुनर्वसन मान्य नसून तेथील आदिवासी आम्हाला सुखाने जगू देणार नाहीत, त्यामुळे 'आता आम्ही येथेच राहणार व येथेच मरणार', अशी भूमिका घेत या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मूळ गावी चुली पेटवल्या.
जावळी तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी, खिरखंडी, कुसापूर, तांबी, वासोटा येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन एकसळ सागाव (ता. भिवंडी, जि. ठाणे) या ठिकाणी २०१५ साली पुनर्वसन करण्यात आले. एकूण १२० खातेदारांकरिता त्या ठिकाणी केंद्र शासनाकडून २४२ हेक्टर जागा दिली होती. मात्र, पहिल्या टप्प्यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या एकूण ७० कुटुंबांचे पुनर्वसन हे त्या ठिकाणी करण्याचे व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी ठरवले. त्यापैकी खिरखंडी येथील सहा कुटुंबे वगळता त्या ठिकाणी बाकीचे प्रकल्पग्रस्त वास्तव्यास गेले.
मात्र नजीकच असणाऱ्या आदिवासी लोकांचा त्रास या लोकांना गेल्या दहा वर्षांपासूनच त्या ठिकाणी होत आहे. त्या त्रासाला कंटाळून व सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा आपल्या मूळगावी परतण्याचे निश्चित केले.
काल त्यांनी एकसळ सागाव (जि. ठाणे) येथून एकूण २२ जण मिनी ट्रॅव्हल्सने महाबळेश्वरला आले. तिथून कुरोशीपुलावरुन वाघावळे, उचाट, आकल्पे या ठिकाणी साडेनऊ वाजता पोहोचले. त्यानंतर आकल्पेमधून पायी चालत दुपारी बाराच्या सुमारास रवंदी, आडोशीमार्गे माडोशी येथे प्रकल्पग्रस्त पोहाचले.
यातील काहीजण दुचाकीवरुन बामणोलीत आले. तिथून खासगी बोटींनी गावी पोहोचले. जवळपास ६० प्रकल्पग्रस्तांनी आपले मूळ गाव गाठले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मूळ गावी जाऊ नयेत म्हणून सर्व प्रकारची यंत्रणा कार्यान्वित केली होती.
त्यानंतर देखील व्याघ्र प्रकल्पग्रस्त हे चालत पायी मार्गाने कोअरक्षेत्रात बोटीने न जाता बफर क्षेत्रात बोटी लावून पायी आपल्या मूळ गावी पोहोचले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिकक्षेत्र अधिकारी अक्षय करमळकर तसेच बामणोली वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे यांनी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली.