

दहिवडी : मलवडी, ता. माण येथे दुचाकीवरून निघालेल्या तरुणास अडवून त्याच्या हातातील चांदीचे ब्रेसलेट मारहाण करून, दमदाटी व दहशत निर्माण करून लुबाडल्याप्रकरणी तिघांना दहिवडी पोलिसांनी अटक केली.
चोरी, रॉबरी, खुनाचा प्रयत्न, महिलांवर अत्याचार तसेच परिसरात दहशत पसरवने असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या दीपक मसुगडे व त्याच्या टोळीस सपोनि दत्तात्रय दराडे व सहकार्यांनी धडक मोहीम राबवून तातडीने जेरबंद केले.
मलवडी ते परकंदी जाणार्या रोडवर एका हॉटेल समोर फिर्यादी प्रवीण शिवाजी सत्रे (रा. सत्रेवाडी, ता. माण) हा थांबला असताना पाठीमागून लाल रंगाच्या दुचाकीवरुन येऊन दीपक नामदेव मसुगडे, सुरज कैलास जाधव, महेश आप्पासो जाधव (सर्व रा. नवलेवाडी ता. माण) यांनी फिर्यादीस मारहाण करून त्याच्या हातातील चांदीचे ब्रेसलेट जबरीने घेऊन दुचाकीवरुन निघून गेले. याबाबत फिर्यादीने दहिवडी पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केल्याने दीपक मसुगडे, सूरज जाधव,महेश जाधव यांच्यावर चोरी, दहशत पसरवणे यासह अनेक गुन्हे दाखल केले आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रेय दराडे, महिला पोलिस उपनिरीक्षक चांदनी मोटे, स्वाती धोंगडे, पोलिस उपनिरीक्षक यशवंत जामदार, गुलाब दोलताडे, पोलिस कॉन्स्टेबल आजिनाथ नरभट, महेंद्र खाडे, निलेश कुदळे, गणेश खाडे यांनी कारवाई केली. तपास महिला पोलिस उपनिरीक्षक चांदणी मोटे करत आहेत.