सातारा: 'फ्रेंडशिप डे'च्या दिवशी मैत्रीच्या आणाभाका घेण्यासाठी तरुणाईने चक्क आपला जीव धोक्यात घातल्याचा धक्कादायक प्रकार पुणे-बंगळूर महामार्गावर समोर आला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारच्या खिडक्या आणि सनरूफमधून बाहेर लटकत या युवक-युवतींनी केलेला थिल्लरपणा पाहून इतर वाहनचालकांच्या काळजाचा ठोका चुकला. या जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी नऊच्या सुमारास भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत, पाचवड ते वेळे दरम्यान ही घटना घडली. सुट्टीचा दिवस असल्याने महामार्गावर पुणे आणि कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी होती. याच गर्दीतून एक कार सुसाट वेगाने जात होती. या कारमध्ये खुलेआम जीवघेणा स्टंट सुरू होता.
खिडकीतून लटकलेले तरुण: कारच्या दोन्ही बाजूच्या खिडक्यांमधून दोन तरुण अक्षरशः बाहेर लटकले होते.
सनरूफमध्ये 'सेलिब्रेशन': कारच्या सनरूफमधून एक तरुण आणि एक तरुणी उभे राहून 'फ्रेंडशिप डे'च्या आणाभाका घेत होते.
जीवघेणे चित्रीकरण: धक्कादायक म्हणजे, खिडकीतून लटकलेले तरुण या सनरूफमधील युगुलांचे फोटो आणि व्हिडिओ शूट करत होते.
महामार्गावर वेगात चाललेल्या कारमधील हा जीवघेणा प्रकार पाहून लगतच्या इतर वाहनचालकांनाही अपघाताची भीती वाटू लागली. एका चुकीमुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. या संपूर्ण प्रकाराचा थरार एका सुजाण नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.
हा व्हिडिओ रविवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या तरुणाईच्या बेजबाबदारपणावर तीव्र शब्दात टीका केली आहे. दुसऱ्या जिल्ह्यातील या कारमधील संबंधित तरुणांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. लाईक्स आणि व्ह्यूजच्या नादात महामार्गावर अशाप्रकारे स्टंटबाजी करणे केवळ बेकायदेशीरच नाही, तर स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे आता भुईंज पोलिसांसमोर या स्टंटबाजांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.