Hundred trees will be planted in Satara Gavthan limits
सातारा गावठाण हद्दीत शंभर वृक्षांची लागवड होणार Pudhari File photo
सातारा

गावठाण हद्दीत आजपासून शंभर वृक्षांची लागवड

पुढारी वृत्तसेवा

सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दि. 1 ते 28 जुलैअखेर महाराष्ट्र कृषिदिन ते जागतिक संवर्धन दिनापर्यंत वृक्षारोपण मोहीम जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत राबवण्यात येणार आहे. गावठाण परिसरात सुमारे 100 झाडे लावण्यावर भर दिला जाणार आहे.

सातारा जिल्ह्यात मार्च 24 ते मे 24 या कालावधीत उच्चांकी तापमान झाले होते. वृक्ष लागवड कालाधीत ग्रामपंचायतींनी गावच्या सीमेतील सार्वजनिक जागावर किमान 100 झाडे लावावीत. लावण्यात येणारी झाडे देशी प्रजातीची व स्थानिक परिस्थितीनुसार चांगल्या वाढीसाठी अनुकूल झाडे लावावीत. लावण्यात येणार्‍या झाडांसाठी व संगोपनासाठी ग्रामपंचायतीकडील ग्रामनिधी, पंधरावा वित्त आयोग, बक्षिस स्वरूपात मिळालेला निधी, लोकवर्गणी, सी एस.आर. निधीमधून खर्च करावा.

झाडे दिर्घकाळ संवर्धनाची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायतीवर राहिल. वृक्ष लागवड मोहिमेवर गटविकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, कृषि अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत व कृषि) यांनी दैनंदिन संनियंत्रण ठेवून ग्रामपंचायतींना भेटी देवून प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य, युवा मंडळे, स्वयंसहाय्यता गट, माजी सैनिकांचा सहभाग घेवून मोहीम प्रभावी राबवण्यात येणार आहे.

झाडांचे होणार जिओ टॅगिंग

वृक्ष लागवड मोहिमेत लावलेल्या झाडांचे ग्रामपंचायतनिहाय जिओ टॅग फोटोग्राफ्स तालुकास्तरावर संकलीत करण्यात येणार आहेत. संनियंत्रण अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी व त्यांना सहाय्य करण्यासाठी तालुक्यातील एका ग्रामसेवकांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी दिली.

SCROLL FOR NEXT