सातारा : मराठ्यांच्या ऐतिहासिक राजधानीत होणार्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. सातारच्या छत्रपती शाहू महाराजांच्या आदेशाने पानिपत युद्धाची गर्जना झाली होती. हेच पानिपतचे युद्ध आपल्या अजोड लेखनशैलीने अजरामर करणार्या विश्वासरावांची पाटीलकी आता साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून गाजणार आहे. ज्या सातारा जिल्ह्यात धरणग्रस्तांच्या वेदना मांडणारी ‘झाडाझडती’ विश्वास पाटलांनी लिहिली त्याच सातारा जिल्ह्यात होत असलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची वरमाला विश्वास पाटील यांच्या गळ्यात पडत असल्याचाही दुग्धशर्करा योग आला आहे.
पानिपत युद्धातील भाऊसाहेब पेशवे, मल्हारराव होळकर, रघुनाथराव पेशवे, विश्वासराव, दत्ताजी शिंदे, महादजी शिंदे, अहमदशहा अब्दाली, नाना फडणीस अशी पात्रे जिवंत करून वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारा अन् सातार्याच्या अन्यायग्रस्तांची ‘झाडाझडती’ मांडणारा साहित्यातील ‘महानायक’ सातार्यात होणार्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. साहित्यिक विश्वास पाटील यांच्या निवडीमुळे सातारा, सांगली, कोल्हापूर या रांगड्या साहित्यरसिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध व लोकप्रिय कादंबरीकार आहेत. त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय विषयांवर आधारित अनेक प्रभावी कादंबर्या लिहल्या आहेत. ‘पानिपत’ ही त्यांची सर्वाधिक गाजलेली ऐतिहासिक कादंबरी असून तिच्यातून त्यांनी आपल्या संपादकीय शैलीची एक आगळीवेगळी छाप मराठी वाचकांवर पाडली आहे. त्यांच्या संपादकीय शैलीची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे सखोल संशोधन, भाषेची ताकद, घटनांच्या चित्रणातील नाट्यमयता आणि मानवी भावभावनांचे जिवंत दर्शन, पानिपतसारख्या ऐतिहासिक कादंबरीसाठी त्यांनी प्रचंड अभ्यास केला. विविध ऐतिहासिक ग्रंथ, दस्तऐवज, पत्रव्यवहार तसेच तत्कालीन स्थलदर्शन यावर आधारित तपशील त्यांनी कथानकात गुंफले आहेत. यामुळे त्यांची लेखनशैली तथ्यपूर्ण, विश्वासार्ह आणि ऐतिहासिकदृष्ट्या बिनचूक वाटते. त्यांच्या शैलीतील एक विशेष पैलू म्हणजे भाषेतील लालित्य व ताकदीचा समतोल. ऐतिहासिक काळाच्या अनुरुप भाषाशैली त्यांनी वापरली असूनही ती वाचकांना दुरावलेली वाटत नाही. त्यांची भाषा प्रवाही, समृद्ध आणि वाचकांच्या भावनांना स्पर्श करणारी आहे. युद्धप्रसंग, राजकीय चढाओढी आणि वैयक्तीक संघर्ष हे सारे प्रसंग ते अशा शैलीत मांडतात की वाचक त्या काळात डोकावतोय, असा भास होतो.
1993 मध्ये सातार्यात झालेल्या 66 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तत्कालिन मंत्री अभयसिंहराजे भोसले हे होते. या संमेलनामध्ये सातारकर रसिकांनी विश्वास पाटील यांची मुलाखत ऐकण्यासाठी तुडुंब गर्दी केली होती. प्रदीर्घकाळ ही मुलाखत चालली. अजूनही ती अनेकांच्या स्मरणात आहे.
सातार्यातील ग्रंथमहोत्सवामध्ये विश्वास पाटील यांची उपस्थिती कायमच प्रेरणादायी ठरते. शंकर सारडांसोबत ग्रंथमहोत्सवाच्या उद्घाटनाला विश्वास पाटील आले होते. याच कार्यक्रमात त्यांच्या ‘संभाजी’ या कादंबरीची सातारकर व महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या साहित्य रसिकांनी रांगा लावून खरेदी केली होती.