ढेबेवाडी : ढेबेवाडी मार्गे पाटणला जाणार्या मार्गावरील घाटात रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अधेमध्ये ढासळणार्या दरडींमुळे पावसाळ्यात या मार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रहदारी बंद झाली नसली तरी सतत निर्माण होत असलेली धोकादायक स्थिती कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक व प्रवाशांनी केली आहे.
याबाबत ढेबेवाडी विभागातील विविध गावातील नागरिकांनी, वाहनचालक व दुचाकीस्वारांनी दिलेल्या माहितीनुसार पाटण हे तालुक्याचे ठिकाण असल्याने शासकीय, शैक्षणिक व अन्य कारणासाठी दररोज शेकडो नागरिकांना एसटी, वडाप वा दुचाकी अशा वाहनाने पाटणला जावे लागते. साखर कारखान्याची ऊस वाहतुक याच मार्गाने होते. त्यामुळे हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहेच पण मोठ्या रहदारीचा आहे. हा रस्ता दुरूस्तीसाठी गेल्या 8-10 वर्षात कोट्यवधी रुपये मग ते रस्ता मजबुतीकरण असो, रूंदीकरण, फरशीपुल दुरूस्ती वा नूतनीकरण अशा कामासाठी खर्च झाले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून सतत काही ना काही कामे सुरूच असतात. पण ढेबेवाडी- पाटण रस्ता काही परिपूर्ण झालेला नाही. अनेक वर्षापासून कामे सुरु असली तरी काही ठिकाणी रस्ता खड्ड्यातच आहे. ना रूंदीकरण ना मजबुतीकरण व ना सुस्थितीत आहे. या मार्गावर मालदनपासून पुढे सुरु होणार्या घाटात उंच दरडी आहेत. पावसाळ्यात कोसळतात व रहदारी प्रभावित होण्याच्या घटना घडत असतात.
पावसाळ्यात या मार्गावरील प्रवास धोकादायक
रस्ता दुरुस्तीसाठी 8-10 वर्षात कोट्यवधी खर्च
दिवशी घाटात सुद्धा अनेक ठिकाणी दरडी आहेत. त्या कोसळून काही दुर्घटनाही घडल्या आहेत. दरवर्षीच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असले तरी त्या रोखण्यासाठी अजून प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत. मालदन बाजूकडून पुढे गेल्यावर घाटात अनेक ठिकाणी रस्ता अरूंद असून तोही खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते. असे प्रकार बंद होण्यासाठी किमान पावसाळ्यात असे खड्डे तात्परते का होईना मुरूम टाकून भरून घ्यावेत, अशी मागणी आहे.