पाडेगाव ऊस संशोधन केंद्रात शेतकरी आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे.  (Pudhari Photo)
सातारा

Satara News | पाडेगाव ऊस संशोधन केंद्र होणार जागतिक दर्जाचे : कृषिमंत्री कोकाटे

कृषिमंत्र्यांनी ऊस संशोधन केंद्राला भेट देत शेतकरी आणि शास्त्रज्ञांशी सुसंवाद साधला

पुढारी वृत्तसेवा

पुणे : ऊस उत्पादक शेतकर्‍यांची उसाची पंढरी समजल्या जाणार्‍या पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे (फलटण, जि. सातारा) काम सर्वोत्कृष्ट आहे. या संशोधन केंद्राकडून विकसित ऊस वाण संपूर्ण देशात प्रसारित असले तरी या केंद्राचे बळकटीकरण करून जागतिक दर्जाचे केंद्र आपण बनविणार आहे, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.

या संशोधन केंद्राला 94 वर्षे पूर्ण झाली आहे. 2032 साली या केंद्रास 100 वर्ष पूर्ण होतील. त्यापूर्वी शेतकर्‍यांसाठी सुसज्ज, सर्व सोयीने परिपूर्ण असे हे केंद्र जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविण्यासाठी सज्ज असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राला कृषिमंत्र्यांनी भेट देत शेतकरी आणि शास्त्रज्ञांशी नुकताच सुसंवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या केंद्राला जवळपास 17 वर्षानंतर एखाद्या कृषीमंत्र्याने भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कृषिमंत्र्यांनी संपूर्ण दिवस शेतकर्‍यांशी संवाद साधत ऊस उत्पादनातल्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी व्यासपीठावर पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले उपस्थित होते.

यावेळी इंजिनिअर मिलिंद डोके यांनी ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथील प्रस्तावित इमारतींचा आराखडा सादर केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ऊस संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र भिलारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. दत्तात्रय थोरवे यांनी यांनी मानले.

पाडेगावच्या ऊस वाणांमुळेच शेतकर्‍यांची भरभराट

पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या उसाच्या वाणाखाली देशात 56 टक्क्यांइतके क्षेत्र आहे. तर महाराष्ट्रात 87 टक्के क्षेत्र पाडेगावच्या ऊस वाणाने व्यापले आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या भरभराटीमध्ये व साखर कारखान्यांच्या प्रगतीमध्ये पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचा सिंहाचा वाटा आहे. संशोधन केंद्राने उसाचे 86032, फुले 265, 15012, 15006, 13007 असे अनेक सरस वाण दिलेले आहेत.

दरम्यान, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटप्रमाणे (व्हीएसआय) पाडेगाव केंद्रास प्रति टन एक रुपया संशोधनासाठी दिल्यास हे केंद्र शेतकर्‍यांना अधिकाधिक विकसित ऊस वाण व सेवा देऊ शकेल, असा विश्वास बहुतांश शेतकर्‍यांनी व्यक्त केला.

नवीन प्रशासकीय इमारत लवकरच मिळणार

पाडेगाव केंद्राला नवी प्रशासकीय इमारत, शेतकरी निवास व प्रशिक्षण केंद्र, कर्मचारी निवासस्थान, टिश्यू कल्चर प्रयोगशाळा, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रक्षेत्र कार्यालय उभारणीसाठी कोकाटे यांनी तत्वतः मान्यता यावेळी दिली. त्यामुळे या केंद्राचा कायापालट शक्य होऊ शकेल. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार कृषी विद्यापीठे आणि खासगी कंपन्यांनी एकत्र येऊन ट्रॅक्टर ऑपरेटेड छोटे शुगरकेन हार्वेस्टर तयार करावे. यामुळे अल्पभूधारक शेतकर्‍यांना फायदा होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT