Satara news 
सातारा

Satara | राजकीय पटावर विरोधकांचे गणित कोलमडले

यशराज देसाईंच्या रणनीतिचा निर्णायक ठसा; ४२ वर्षांनंतर सहकाराच्या सत्ताकेंद्रात पुनर्स्थापना

पुढारी वृत्तसेवा

सणबूर : तुषार देशमुख

पाटणच्या राजकारणात केवळ सत्ता मिळवणे महत्त्वाचे नसते, तर विरोधकांनी उभ्या केलेल्या राजकीय आव्हानांना परतवून लावत आपले वर्चस्व टिकवणे ही खरी कसोटी असते. कृषी उत्पन्न बाजार समितीपासून सुरू झालेला संघर्ष विधानसभा निवडणुकीपर्यंत पोहोचला, त्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांतून अधिक तीव्र झाला आणि आता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्याचा निर्णायक टप्पा पाहायला मिळाला. या संपूर्ण राजकीय प्रवासात मंत्री शंभूराज देसाई यांचे नेतृत्व केंद्रस्थानी राहिले; मात्र प्रत्येक लढतीतील संघटनात्मक हालचाली, कार्यकर्त्यांशी संपर्क आणि राजकीय डावपेचांना दिशा देण्यात चेअरमन यशराज देसाई यांची भूमिका ठळकपणे पुढे आली.

राजकीय संघर्षाची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून झाली. सहकार आणि स्थानिक संस्थांवरील वर्चस्वाची ही लढाई केवळ बाजार समितीपुरती मर्यादित नव्हती; तिचे पडसाद पुढील राजकीय समीकरणांवरही उमटणार होते. या निवडणुकीत देसाई गटाने संघटनात्मक ताकद दाखवली. गावपातळीवरील कार्यकर्त्यांशी संपर्क, स्थानिक समीकरणांची जुळवाजुळव आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची भूमिका यात यशराज देसाई सक्रिय राहिले. या लढतीतून पुढील मोठ्या राजकीय संघर्षाची पायाभरणी झाली.

यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा संघर्ष अधिक व्यापक झाला. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, भाजपचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, यज्ञसेन पाटणकर यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी शंभूराज देसाई यांच्याविरोधात राजकीय ताकद पणाला लावली होती. मात्र या आव्हानात्मक परिस्थितीत यशराज देसाई यांनी प्रचारापुरती भूमिका न ठेवता कार्यकर्त्यांशी संपर्क, मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन आणि विविध पातळ्यांवरील समन्वय यावर लक्ष केंद्रित केले. ना. शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाला या संघटनात्मक ताकदीची जोड मिळाली आणि विजयाचा मार्ग सुकर झाला.

विधानसभा निवडणुकीनंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांतही राजकीय संघर्ष कायम राहिला. या निवडणुकांमध्येही ना. शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली देसाई गटाने आपली संघटनात्मक पकड अधिक मजबूत करण्यावर भर दिला. निवडणुकीतील विजय हा केवळ निकालाच्या दिवशी घडत नसतो; त्यासाठी आधीपासून उभी करावी लागणारी यंत्रणा, कार्यकर्त्यांचा विश्वास आणि प्रत्येक गावातील राजकीय परिस्थितीची अचूक जाण महत्त्वाची असते. या प्रक्रियेत यशराज यांची सक्रियता दिसून आली.

या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक देसाई गटासाठी केवळ एका जागेची लढाई नव्हती. ती प्रतिष्ठेची, सहकारातील पुनरागमनाची आणि चार दशकांहून अधिक काळानंतर एका राजकीय वारशाला पुन्हा संस्थात्मक व्यासपीठ मिळवून देण्याची लढाई होती. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला दिशा दिली होती. तब्बल ४२ वर्षांनंतर पुन्हा जिल्हा बँकेच्या सत्ताकेंद्रात प्रवेश करण्याची संधी निर्माण झाली. त्याचवेळी या प्रवेशाला रोखण्यासाठी जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील राजकीय शक्तींकडून जोरदार मोर्चेबांधणी झाली होती.

या निवडणुकीत खरी कसोटी होती ती पडद्यामागील राजकीय गणितांची. संस्थांचे ठरावधारक, स्थानिक सहकारातील पदाधिकारी आणि मतदानाच्या दिवसापर्यंत टिकवून ठेवावा लागणारा समन्वय या सगळ्यांचा ताळमेळ साधणे सोपे नव्हते. याच ठिकाणी यशराज देसाई यांनी रणनिती आखली आणि त्यांनी राजकारणात पुढचे पाऊल टाकले.

यशराज देसाई यांच्या नेतृत्वाला शंभूराज देसाईंच्या मार्गदर्शनाची जोड !

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा वारसा जपत यशराज देसाई यांनी सहकार, सामाजिक कार्य आणि संघटनात्मक पातळीवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. तरुण कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत आणि तालुक्याच्या राजकारणातील घडामोडींचा अभ्यास ही त्यांच्या नेतृत्वाची जमेची बाजू ठरत आहे. या वाटचालीत मंत्री शंभूराज देसाई यांचे अनुभवसंपन्न मार्गदर्शन त्यांना लाभत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT