Satara Farmer Loan Waiver : सातारा जिल्ह्यातील ३४५८१ शेतकरी कर्जमुक्त

कर्जमाफीचे २५२.८८ कोटी रुपये खात्यावर जमा : चौथ्या यादीत ४८७६ शेतकऱ्यांना लाभ
 Farmer Loan Waiver Scheme
Farmer Loan Waiver Schemepudhari photo
Published on: 
Updated on: 

सातारा : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर तब्बल २५२ कोटी ८८ लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे. बुधवारी चौथी लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये ४ हजार ८७६ शेतकऱ्यांना ३२ कोटी ९८ लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील एकूण ५१ हजार ४५३ कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी ४१ हजार ५२६ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यातील ३६ हजार ६४३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) पूर्ण केले आहे. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या तीन याद्यांमधून सातारा जिल्ह्यातील २९ हजार ७०५ शेतकऱ्यांना २१९ कोटी ९० लाख रुपयांचा लाभ मिळाला होता. आता ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या चौथ्या यादीत आणखी ४ हजार ८७६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३२ कोटी ९८ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

या चौथ्या यादीतील लाभार्थ्यांमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३ हजार ७८३ शेतकऱ्यांना २२ कोटी रुपये, तर राष्ट्रीयीकृत व इतर व्यापारी बँकांमधील १ हजार ९३ शेतकऱ्यांना १० कोटी ९८ लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील २९ हजार ६०१ शेतकऱ्यांना २०५ कोटी ७२ लाख रुपये, तर राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांमधील ४ हजार ९८० शेतकऱ्यांना ४७ कोटी १६ लाख रुपये मिळाले आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना २५२ कोटी ८८ लाख रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.