सातारा : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील दोन जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्याने ख़ा. उदयनराजे भोसले यांच्या रिक्त जागेवर अजितदादा पवार यांनी ज्यांना शब्द दिला आहे ते नितीनकाका पाटील उमेदवार राहतील की जिल्हा भाजपने केलेल्या ठरावाप्रमाणे भाजप आपला उमेदवार देणार याविषयी सातार्यात कुतूहल निर्माण झाले आहे. ‘उदयनराजेंना निवडून द्या मी नितीनकाकाला राज्यसभेवर खासदार करतो’ हा अजितदादांनी दिलेला शब्द त्यांचेच मित्र देवेंद्र फडणवीस पाळणार का? याविषयी त्यामुळेच उत्सुकता निर्माण झाली आहे.
पियूष गोयल व उदयनराजे भोसले हे दोघेही राज्यसभेचे खासदार होते. दोघेही लोकसभेवर निवडून गेल्याने महाराष्ट्रातील दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांसाठी 3 सप्टेंबरला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी दि. 14 ते 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तर 26 ऑगस्टला अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. दि. 3 सप्टेंबर रोजी मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
रिक्त दोन जागांपैकी एक जागा भाजप राष्ट्रवादीला सोडणार असल्याची चर्चा आहे. मुळातच सातारा लोकसभेच्या जागा वाटपावेळी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जाणार होती. नितीनकाका पाटील यांना अजितदादा पवार गटाकडून उमेदवारीही मिळणार होती. मात्र, अंतिम क्षणी ही जागा खेचून आणण्यात भाजपला व उदयनराजे भोसले यांना यश आले. त्यावेळी बरेच नाराजी नाट्य घडले होते. पुण्यात झालेल्या बैठकीत नितीनकाकांना उमेदवारी देण्याचा आग्रह राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी केला होता तेव्हाच ‘आपल्याला राज्यसभा मिळणार आहे’, असे अजितदादा बोलून गेले होते. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत आ. मकरंद पाटील व नितीनकाका पाटील यांची टीम सुरुवातीला उदयनराजेंच्या प्रचारात सक्रीय नव्हती. त्यामुळे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या लोकसभा निवडणुकीवेळी वाई येथे झालेल्या महायुतीच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी उदयनराजे भोसले यांना तुम्ही मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्या मी नितीनला जुलै महिन्यात खासदार करुन दाखवतो, अशी घोषणा केली होती.
त्यानंतर उदयनराजे लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवरच ही निवडणूक होत आहे. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा अजित पवारांना भेटले आहे त्यावेळीही नितीनकाकाला खासदार करणार आहे हा माझा शब्द आहे आणि मी तो पाळणार असे अजितदादा बोलून गेले आहेत.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या घडामोडी सुरु असतानाच दुसरीकडे भाजपच्या जिल्हा पक्ष कार्यकारिणीने राज्यसभेच्या रिक्त जागेवर भाजपच्या निष्ठावंताला संधी देण्याचा ठराव केला आहे. हा ठराव निरीक्षक आ. योगेश टिळेकर व मेधा कुलकर्णी यांच्यासमोर झालेल्या बैठकीत करण्यात आला होता. त्यामुळे भाजप या ठरावावर ठाम राहणार का? याविषयीही कुतुहल आहे. भाजपने त्यावेळी केलेला हा ठराव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव तंत्राचीही खेळी असू शकते.
राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली असतानाच देवेंद्र फडणवीस आज सातार्यात आहेत. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आ. मकरंद पाटील हेही देवेंद्र फडणवीस यांना भेटले आहेत. अजितदादा व देवेंद्र फडणवीस यांची मैत्री सर्वश्रृत आहे. दोन जागांपैकी एक जागा तर राष्ट्रवादीला द्यावी लागेल. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसला संधी देवून फडणवीस अजितदादांनी दिलेला शब्द पाळणार का? याविषयी सातारा जिल्ह्यात कुतुहल निर्माण झाले आहे. त्याचवेळी फडणवीसांच्या दौर्यात जिल्हा भाजपची भूमिका काय राहिल याविषयीही उत्सुकता आहे.