सातारा

Satara APMC Election: कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीची बाजी; पाटणमध्ये सत्तांतर

अविनाश सुतार

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांसाठी (Satara APMC Election) आज (दि.१)  मतमोजणी झाली. या मतमोजणी मध्ये पाटण मध्ये सत्तांतर झाले आहे. राष्ट्रवादीने महाविकास आघाडीला फाट्यावर मारत वाई, लोणंद, फलटण आणि कोरेगाव या बाजार समित्यांवरील आपली सत्ता अबाधित ठेवली. वडूज मध्ये माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी राष्ट्रवादीला चारी मुंड्या चीत केले. तर साताऱ्यात आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पुन्हा एकदा बाजार समिती ताब्यात घेत भाजपचा झेंडा फडकवला. कराडात चुरशीने झालेल्या लढतीमध्ये आ. पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह उंडाळकर गटाने राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील व भाजपचे अतुल भोसले यांच्या गटाचा पराभव केला.

सातारा बाजार समितीमध्ये आ. शिवेंद्रराजे गटाची बाजी

सातारा बाजार समितीमध्ये (Satara APMC Election) आमदार शिवेंद्रराजे यांच्या नेतृत्वाखालील अजिंक्य विकास पॅनल आणि स्वाभिमानी विकास आघाडीमध्ये लढाई झाली. यामध्ये आ. शिवेंद्रराजे गटाने बाजार समितीच्या सर्वच्या सर्व 18 जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. या निवडणुकीत स्वाभिमानी विकास आघाडीला खा. उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा दिल्याने चुरशीची निवडणूक होणार अशी शक्यता होती. मात्र आमदार गटाच्या उमेदवारांनी तब्बल 800 ते 900 मतांच्या फरकाने विजय मिळवला. साताऱ्याची बाजार समिती पूर्वी राष्ट्रवादीच्या ताब्यात होती आता ती भाजपच्या ताब्यात आली आहे.

Satara APMC Election : वाई बाजार समितीमध्ये आ. मकरंद पाटील यांचा डंका

वाई बाजार समितीमध्ये आ. मकरंद पाटील यांनी आपला डंका वाजवला आहे. बाजार समितीच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलने सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादी विरोधात भाजप शिवसेना आणि काँग्रेसच्या बंडखोर गटाने पूर्ण ताकद पणाला लावली. मात्र त्याचा फारसा काही परिणाम दिसून आला नाही. यापूर्वीच राष्ट्रवादीच्या सहा जागा बिनविरोध झाल्या असून एक जागा विरोधकांकडे गेली आहे.

लोणंद बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचा एकहाती विजय

लोणंद बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने 18 पैकी 17 जागांवर विजय मिळवला. तर विरोधी भाजप शिवसेना आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले. या ठिकाणी राष्ट्रवादीला बंडखोरीचा सामना करावा लागला. हा मकरंद पाटील यांनी बंडखोरी शमावली असली तरी मतदानातून अनेकांनी आपली नाराजी दर्शवली. त्यामुळेच मागील निवडणुकीत असलेली २०० मतांची आघाडी यावेळी केवळ ५० मतांवर आली होती.

कोरेगाव बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीने सत्ता अबाधित ठेवली

कोरेगाव बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीने आपली सत्ता अबाधित ठेवली आहे. बाजार समितीच्या मतमोजणी मध्ये राष्ट्रवादीला 16 आणि आ. महेश शिंदे यांच्या गटाला एक जागा मिळाली. तर एका जागेवर अपक्षाने विजय मिळवला. आ. महेश शिंदे यांनी जिल्हा बँकेवेळी राष्ट्रवादीचे मतदार फोडून आपल्या समर्थकाला संचालक केले होते. मात्र हा चमत्कार त्यांना पुन्हा करता आला नाही. त्यामुळे कोरेगावात झालेल्या दोन आमदारांच्या फाईट मध्ये आ. शशिकांत शिंदे यांनी विजय मिळवला. एका मागोमाग एक संस्था गेल्यानंतर बाजार समितीतील मिळालेला विजय हा राष्ट्रवादीसाठी बूस्टर डोस ठरणार आहे.

Satara APMC Election : फलटण बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात

फलटण बाजार समितीमधून खासदार गटाने माघार घेतल्याने राजे गटांमध्येच द्वंद्व झाले होते. अर्ज माघारी वेळी चार जागा बिनविरोध होऊन 14 जागांसाठी रविवारी मतदान झाले. सर्व जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये राजे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये लढत झाल्याने फलटण बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे.

वडूज बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचा पराभव

वडूज बाजार समितीमध्ये माजी आ. प्रभाकर घार्गे यांच्या नेतृत्वाखालील खटाव विकास आघाडीने राष्ट्रवादीचा एकतर्फी पराभव केला. बाजार समिती निवडणुकीसाठी प्रभाकर घार्गे यांना आ. जयकुमार गोरे, दिलीप येळगावकर यांच्यासह अन्य नेत्यांनी साथ दिली. तर राष्ट्रवादीने नंदकुमार मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली मात्र राष्ट्रवादी या निवडणुकीत सपशेल फेल ठरली.

Satara APMC Election :  कराड बाजार समितीवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा

कराड बाजार समितीमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीचा पराभव केला आहे. या निवडणुकीत भाजपच्या एका गटाने काँग्रेसला तर दुसऱ्या गटाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. आ. पृथ्वीराज चव्हाण आणि स्व. विलासराव उंडाळकर पाटील यांचे चिरंजीव उदयसिंह उंडाळकर पाटील यांच्या रयत पॅनल ला 12 तर माजी सहकार मंत्री राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील व भाजपचे अतुल भोसले यांच्या गटाला ६ जागा मिळाल्या. कराड  बाजार समिती पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात गेली असून काँग्रेसने बाजार समितीवरील सत्ता अबाधित राखली आहे.

पाटण बाजार समितीमध्ये सत्तांतर: शिवसेनेचा भगवा फडकला

पाटण बाजार समितीमध्ये ऐतिहासिक असे सत्तांतर झाले असून पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीचा १५ विरुद्ध ३ असा धक्कादायक पराभव केला. बाजार समिती इतिहासातील हे पहिलेच सत्तांतर असून यामुळे जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर व राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी ग्रामपंचायत वगळता इतर मतदारसंघांवर विजय मिळवून असा अंदाज होता. मात्र ना. शंभुराज देसाई यांनी राजकीय सूत्रे आपल्या हातात घेऊन चक्रे फिरवली होती. त्यामुळेच या मतदारसंघांमध्ये देसाई गटाने बाजी मारली. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडे असणारी बाजार समिती शिवसेनेकडे गेली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT