Politics Updates: राष्ट्रवादी वर्चस्व राखणार की विरोधक बाजी मारणार? pudhari photo
सातारा

Politics Updates: राष्ट्रवादी वर्चस्व राखणार की विरोधक बाजी मारणार?

वाई पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी चौरंगी तर प्रभागात तिरंगी लढतींचा थरार

पुढारी वृत्तसेवा

वेलंग : विकास जाधव

वाई पालिकेत नगराध्यक्षपदासाठी 4 तर नगरसेवकपदासाठी 61 जण मैदानात आहेत. यामुळे नगराध्यक्षपदासाठी चौरंगी तर प्रभागांमध्ये तिरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत ना. मकरंद पाटील व भाजपचे मदनदादा भोसले यांच्या गटातच पारंपरिक लढाई होत आहे. यंदा भाजप, शिवसेना शिंदे गट, शरद पवार गट व काँग्रेसने राष्ट्रवादीला आपापल्या परीने टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी वर्चस्व राखणार की विरोधक बाजी मारणार? हेच पहावे लागणार आहे.

वाईत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे नितीन कदम, भाजपचे अनिल सावंत यांच्यातच चुरस लागणार आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदीप जायगुडे व अपक्ष दीपक जाधव हे मैदानात असून ते किती मते खातात व कोणाला याचा फटका बसतो, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. प्रभागांमध्येही दिग्गजांना भाजपचा सामना करावा लागत आहे. तसेच काही ठिकाणी शिवसेना व शरद पवार गटाने उमेदवार दिल्याने राष्ट्रवादीसमोर तगडे आव्हान निर्माण झाले आहे.

शहरातील प्रभाग 1 मधून राष्ट्रवादीच्या सविता हगीर विरूध्द भाजपच्या अपर्णा जमदाडे यांच्यातच दुरंगी सामना होणार आहे. ब विभागातून राष्ट्रवादीचे संदीप नायकवडी, भाजपचे प्रसाद बनकर, शिवसेनेच्या माया चौधरी यांच्यातच तिरंगी सामना होणार आहे. या प्रभागात उमेदवारांची धावपळ, तिकीट वाटपातील गोंधळ, पक्षांतराची मालिका आणि घराघरात झालेली उमेदवारांची उठाबस यामुळे चुरशीची लढत रंगणार आहे.

प्रभाग 2 मधून भाजपचे ज्ञानेश्वर सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे घनश्याम चक्के तर महिलांमध्ये राष्ट्रऐदीच्या सुप्रिया धनवे व भाजपच्या पद्मा जाधव यांच्यातच अटीतटीचा सामना होणार आहे. प्रभाग 3 मधून राष्ट्रवादीचे संदीप जवळे, भाजपचे बिपीन वैराट यांच्यातच प्रमुख सामना होणार आहे. मात्र, शिवसेनेचे सतीश वैराट व अपक्ष राकेश मोरे यांचेही आव्हान राहणार आहे. महिलांमध्ये शरद पवार गटाच्या शबाना मुजावर, भाजपच्या मीनाक्षी जमदाडे व राष्ट्रवादीच्या जीविता जमदाडे यांच्यात कांटे की टक्कर होत आहे.

सतीश वैराट यांना भाजपने डावलल्याने त्यांनी शिवसेनेतून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला धोका निर्माण झाला आहे. या प्रभागात मुस्लिम वोट बँक असून शरद पवार गाने शबाना मुजावर यांना मैदानात उतरवले असून किती फायदा त्यांना होणार याकडे लक्ष आहे.

प्रभाग 4 मध्ये राष्ट्रवादीच्या शारदा काळे, भाजपच्या छाया सदाफुले, शरद पवार गटाच्या तृप्ती सकटे यांच्यातच तिरंगी सामना होत आहे. पुरूषांमध्ये राष्ट्रवादीचे संग्राम पवार, भाजपचे केदार काटे व शिवसेना शिंदे गटातून कृष्णा भगत हे मैदानात असून अटीतटीचा तिरंगी सामना होणार आहे. प्रभाग 5 मधून राष्ट्रवादीचे भारत खामकर, भाजपचे स्वप्निल भिलारे यांच्यातच लढत होणार आहे.

तर महिलांमध्ये राष्ट्रवादीच्या ज्योती काळे, भाजपच्या ज्योती गांधी व अपक्ष सुनीता मलटणे यांच्यात तिरंगी सामना होणार आहे. प्रभाग 6 मधून राष्ट्रवादीच्या रेणुका जाधव, शिवसेना शिंदे गटाच्या विमल लोखंडे, भाजपच्या जागृती पोरे यांच्यात तिरंगी तर पुरूषांमध्ये राष्ट्रवादीचे चरण गायकवाड, भाजपचे विजय ढेकाणे यांच्यातच दुरंगी सामना रंगणार आहे. प्रभाग 7 मधून राष्ट्रवादीचे शैलेंद्र देवकुळे, भाजपचे कुलदीप शिंदे यांच्यातच सामना होत आहे.

महिलांमध्ये राष्ट्रवादीच्या विजया खोपडे व भाजपच्या केतकी मोरे यांचयातच दुरंगी लढत होत आहे. प्रभाग 8 मधून राष्ट्रवादीचे अजित शिंदे, भाजपचे अजित वनारसे व अपक्ष सुरेश शिंदे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. महिलांमध्ये भाजप पुरस्कृत पद्मा पिसाळ व राष्ट्रवादीच्या पद्मश्री चोरगे यांच्यातच झुंज लागणार आहे. प्रभाग 9 अ मध्ये राष्ट्रवादीच्या रेखा जाधव या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

तर ब मध्ये राष्ट्रवादीचे उमेश जायगुडे, काँग्रेसचे प्रदीप जायगुड व अपक्ष सुशील खरात, बाळकृष्ण खरात यांच्यात चौरंगी लढत होत आहे. या ठिकाणी अपक्ष कोणाची मते खातात, यावरच गणिते अवलंबून आहेत. प्रभाग 10 मध्ये राष्ट्रवादीच्या नीलिमा खरात विरूध्द अपक्ष संगीता गुरव यांच्यातच दुरंगी सामना रंगणार असून गुरव यांचा राष्ट्रवादीसमोर किती टिकाव लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

पुरूषांमध्ये राष्ट्रवादीचे गुरूप्रसाद चव्हाण, शिवसेना शिंदे गटाचे योगेश फाळके आणि अपक्ष संदीप डोंगरे यांच्यातच चुरस लागली आहे. डोंगरे हे माजी नगरसेवक असून त्यांना राष्ट्रवादीने डावलल्याने कांटे की टक्कर होणर आहे. प्रभाग 11 मधून तीन नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत.

यामध्ये अ विभागात राष्ट्रवादीच्या संतोष गोंजारी विरूध्द भाजपचे संग्राम सपकाळ यांच्यात दुरंगी, ब विभागात राष्ट्रवादीच्या उज्वला शिंगटे, शरद पवार गटाच्या मोनिका चव्हाण आणि भाजपच्या दिपाली सावंत यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. तर क विभागात चौरंगी लढत होत असून राष्ट्रवादीच्या प्रिती सावंत, शरद पवार गटाच्या सरला सोनावणे, भाजपच्या नूतन मालुसरे आणि शिवसेनेच्या अस्मिता सावंत मैदानात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT