दहिवडी : शरद पवार यांनी कधीही मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी केलेली नाही. शरद पवार हेच जाती जातीमध्ये तेढ निर्माण करत आहेत. बाहेरून काडी लावून स्वतः शेकत बसण्याचे काम हे करत आहेत, असा आरोप आ. जयकुमार गोरे यांनी खा. शरद पवार यांच्यावर केला.
दहिवडी येथे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेली साथ लक्षात घेऊन मतदार व कार्यकर्त्यांचे आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे, डॉ. संदीप पोळ, माजी सभापती अतुल जाधव, सरपंच दादासाहेब काळे, सोमनाथ भोसले, बाबासाहेब हुलगे, नगरसेवक धनाजी जाधव, अर्जुन काळे, संजय गांधी, राजाराम बोराटे, गुलाबराव कट्टे उपस्थित होते.
आ. जयकुमार गोरे म्हणाले, लोकसभेला बारामती, फलटणपासून अनेकांनी अभ्यास करुन या तालुक्याचे मताधिक्य कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु माण-खटावमधील कार्यकर्त्यांनी व जनतेने 24 हजारांचे मताधिक्य दिले. देशात भाजपाचा पराभव झाला आहे अशा थाटात विरोधक वागत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पंडित नेहरू देशाचे तीन वेळा पंतप्रधान झाले. त्यानंतर नरेंद्र मोदीच फक्त तीन वेळा पंतप्रधान होऊ शकले. मोदींचा पराभव करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. महाराष्ट्रातही मराठा आरक्षणासह अनेक विषयांवर भाजपला जबाबदार धरले जात आहे. मराठा समाजाला शिंदे सरकार व भाजपनेच आरक्षण दिले. परंतु हा विषय निवडणुकीमध्ये आलाच नाही. याउलट शरद पवार यांनी मराठा समाज म्हणून काय केले हे दाखवावे. यांचे व मुलीचे राजकारण टिकण्यासाठी जाती पातीचे राजकारण केले. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा असून त्यांनी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र करून महाराष्ट्र घडवला. परंतु याच महाराष्ट्रात जाती जातीमध्ये फूट पडण्याचे काम शरद पवार करत आहेत, असा आरोपही आ. गोरे यांनी केला.
कुळकजाईवरुन एकजण पाच वर्षांतून एकदा खाली उतरतोय आणि म्हणतोय मलाच महाविकास आघाडीचे तिकीट फायनल झाले आहे. याला दाढी नाही अन् मिशीही नाही आणि दाढीवाल्याला पाडायचंय अस सांगत फिरत आहे. पाच वर्षांतून एकदा येऊन चार-पाच टँकरने पाणी वाटतोय, काही ठिकाणी मुरूम टाकतोय, अशा भुल थापांना जनता बळी पडणार नाही, असा टोला आ. जयकुमार गोरे यांनी शेखर गोरे यांचे नाव न घेता लगावला.