कराड : कराड-विटा मार्गावरील नवीन कृष्णा पुलावरून नदीत उडी घेतलेल्या युवतीचा मृतदेह चार दिवसांच्या शोध मोहिमेनंतर रविवारी सकाळी सापडला. प्रियांनी अशोक कुंभार (वय 19, रा. कापिल, ता. कराड) असे त्या युवतीचे नाव आहे.
गुरुवार, 1 जानेवारी रोजी सकाळी सुमारे 11 वाजता प्रियांनी कुंभार हिने नवीन कृष्णा पुलावरून नदीत उडी घेतली होती. पुलाजवळ तिची चप्पल व बॅग आढळून आल्याने नागरिकांनी कराड शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बोटीच्या सहाय्याने शोध सुरू केला होता. मात्र पहिल्या दिवशी यश आले नाही. त्यानंतर कराड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने शोध मोहिम सुरू ठेवण्यात आली होती. दोन दिवसांनंतर शनिवारी सांगली येथील आयुष हेल्पलाईन पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र मृतदेह सापडला नव्हता. रविवारी सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आला असता सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात मृतदेह आढळून आला. घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.