

नागपूर : मुलगा जिद्द करतो, सांगितलेले ऐकत नाही, घरात शिस्त पाळत नाही.. अशा एक ना अनेक तक्रारी मांडत आई-वडिलांनी चक्क आपल्याच मुलाचे हातपाय साखळदंडाने बांधून त्याला कुलूप लावून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात अजनी पोलिस ठाण्यात पालकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जिल्हा बाल संरक्षण कक्षाने या 12 वर्षे वयाच्या मुलाची सुटका केली. चाईल्ड हेल्प लाइन 1098 वर या संदर्भात माहिती मिळाली होती. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या अध्यक्षतेखाली बाल संरक्षण प्रथम गठित करण्यात आले. या पथकात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, संरक्षण अधिकारी साधना हटवार, कायदा व परीवीक्षा अधिकारी सुजाता गुल्हाने, तसेच चाइल्डलाईन प्रतिनिधी मंगला टेंभुर्णे यांचा समावेश होता. पथकाने माहितीनुसार घटनास्थळी पाहणी केली असता संबंधित मुलगा दहशतीत आढळून आला. त्याची सुटका करून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.
मुलाचे समुपदेशन सुरू
या संदर्भात अजनी पोलिस ठाण्यात पालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून बाल न्याय अधिनियम 2015 तसेच संबंधित कलमानुसार पुढील तपास सुरू आहे. मुलाची वैद्यकीय तपासणी करून त्याला बालगृहात दाखल करण्यात आले आहे. यासोबतच मुलाचे समुपदेशन देखील सुरू करण्यात आले असून नंतर त्याला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात येणार आहे.