Satara Crime News
साधारणत: साठच्या दशकातील ही घटना आहे. आज सातारा जिल्ह्यात असलेला मायनी परिसर त्यावेळी सांगली पोलिसांच्या हद्दीत येत होता. एकेदिवशी सांगली पोलिसांना सांगावा आला की मायनीजवळ असलेल्या एका खेडेगावातील इनामदार नावाच्या एका बागायतदार तालेवाराच्या सात वर्षाच्या सदाशिव नावाच्या मुलाचा कुणीतरी खून केला आहे. केवळ सात वर्षाच्या लहानग्या पोराच्या खुनाची बातमी ऐकून पोलिसही अचंबित झाले. त्यामुळे निरोप मिळाल्याबरोबर फौजदार गायकवाड आपल्या काही साथीदारांना सोबत घेऊन घटनास्थळी हजर झाले.
या इनामदारांचा गावापासून थोड्या अंतरावरील शेतात छोटेखानी बंगला होता, त्याच्या आसपास गावातीलच आणखी काही शेतकर्यांची घरे आणि रानातील दहा-बारा वस्त्या वगैरे होत्या. या वस्त्यांपासून जवळच पिंपळाचे टेक नावाची एक टेकडी होती आणि या टेकडीजवळून एक ओढा वाहत होता. या ओढ्याच्या काठी सदाशिव या लहानग्याचा मृतदेह पडला होता. मृतदेहाचा गळा धारदार शस्त्राने चिरलेला दिसत होता, त्यावरून कुणीतरी अमानुषपणे त्याचा खून केल्याचे दिसून येत होते. फौजदार गायकवाड व त्यांच्या सहकार्यांनी पंचनामा करून आजुबाजूच्या परिसराची तपासणी सुरू केली. त्यावेळी घटनास्थळापासून साधारणत: हजार-पाचशे फुटांवर त्याच ओढ्याच्या काठी एक दुरडी (वेतापासून बनवलेली टोपली) आढळून आली. या दुरडीत एक काळे कापड अंथरण्यात आले होते, त्या कपड्यावर हळदी-कुंकवात माखलेले तान्ह्या मुलांना घालतात तसले अंगडे-टोपडे, एक काळी बाहुली, सुया टोचलेले काही लिंबू, बिबे अशा काही वस्तू मिळून आल्या.
विशेष म्हणजे त्यातील अंगड्या-टोपड्यावर मानवी रक्त शिंपडल्याचे दिसून येत होते. पोलिसांनी तर्काने जाणले की हे रक्त निश्चितपणे सदाचे असले पाहिजे आणि एकूणच हा नरबळीचा प्रकार असावा. त्या अनुषंगाने पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा निश्चित केली आणि पोलिसांनी आपला मोर्चा इनामदारांच्या वस्तीकडे वळविला.
तोपर्यंत सगळ्या वस्तीवर, गावात आणि इनामदारांच्या पै-पाहुण्यांत ही बातमी पसरली होती आणि शे-दोनशे बाया-बापड्यांसह शे-पाचशे लोकांची गर्दी झाली होती. आया-बायांनी एकच आकांडतांडव सुरू केला होता. इनामदारांचे कुणाशी वैर-दुश्मनी असल्याचे दिसून येत नव्हते, त्यामुळे कोणत्या तरी इच्छापूर्तीसाठी कुणीतरी अघोरी मार्गाच्या आहारी जाऊन हा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते. पोलिसांच्या या ताफ्यात तुकाराम टोमके नावाचा एक इरसाल हवालदार होता. गड्याची नजर नुसती घारीसारखी भिरभिरत असायची आणि त्याची ही नजर नेमकं काहीतरी हेरायची. बाया-बापड्यांची ऊर बडवून रडारड सुरू होती आणि टोमके ही रडारड बारकाईनं न्याहाळत होता.
या सगळ्या बायकांच्या गराड्यात एका बाईने जरा जास्तच आकांत मांडलेला दिसत होता, मयत झालेल्या पोराच्या आईपेक्षा तीच मोठ्या आवाजात टाहो फोडताना आणि हाणून-बडवून घेताना, तोंडात बकाका माती कोंबून घेताना आणि शिव्याशाप देताना दिसत होती. टोमकेला वाटलं की ही बाई सदाच्या जवळच्या नात्यातील असावी आणि मयत सदावर तिचा जास्तच जीव असावा, म्हणून बिचारीला एवढं दुःख झालं असावं. त्यामुळे टोमकेंनी जमलेल्या लोकांपैकी एकाला बाजूला घेऊन चौकशी केली आणि त्यामधून जी माहिती मिळाली, त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला दिशा मिळाली. त्या बाईचं नाव वत्सलाबाई होतं.
एखादं पाप लपविण्यासाठी अनेकवेळा संबंधित व्यक्ती नाटक करते. अनेकवेळा हे नाटक खपूनही जाते आणि त्याचे पापही झाकले जाते. कुणाला ही कला साधते तर कुणाला साधत नाही. वत्सलाबाईनं आपलं पाप झाकण्यासाठी असंच एक नाटक केलं, पण या नाटकात तिनं केलेली ‘ओव्हरअॅक्टिंग’ तिच्या अंगलट आली आणि रवानगी थेट कारागृहात झाली..