

वडूज/म्हसवड : घटस्फोटाच्या कारणावरुन सासूचा खून करणार्या जावायाला वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
आबासो बबन काटकर (वय 42, रा. नरवणे ता. माण) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने रंजना हणमंत भोसले (वय 55, रा. शिवाजीनगर (कुकुडवाड) ता.माण) या महिलेचा खून केला होता. तर भांडणात वैशाली आबासो काटकर (वय 40) ही जखमी झाली होती. दि. 22 मार्च 2018 रोजी सायं.5.15 च्या सुमारास शिवाजीनगर (कुकडवाड) ता. माण येथे रंजना भोसले यांच्या घरासमोर ही घटना घडली होती.
जखमी वैशाली काटकर व मयत सासू रंजना भोसले या अंगणात लसूण सोलत बसल्या असताना आबासो काटकर तेथे आला. त्याने घटस्फोटावरुन वैशाली व सासू रंजना यांना शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी रंजना यांनी आरोपी आबासो काटकर याला शिवीगाळ करायचे नाही असे म्हटले असता त्याने सासू रंजना यांना ‘आता तुला दाखवतो, असे म्हणून त्याने त्याच्या हातातील पिशवीतून लाकडी मूठ असलेला सुरा काढला व सासू रंजना यांचा गळा धरला.
दरम्यान, वैशाली व फिर्यादी यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी आबासो काटकर यांनी फिर्यादीस ‘तू मध्ये पडायचे नाही तुझा आणि माझा संबंध नाही’, असे म्हणून फिर्यादी व वैशाली यांना ढकलून दिले. तसेच सासू रंजना यांना गळ्याला धरून घरामध्ये नेले. त्यावेळी फिर्यादी जोरात ओरडल्याने शेजारी राहत असलेल्या चुलत सासू सुनिता या आल्या. त्यांनी रंजना यांना आरोपीच्या ताब्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने यांना मारहाण केली. तसेच सासू रंजना यांच्यावर चाकूने वार करुन त्यांचा खून केला. या गुन्ह्याची म्हसवड पोलिस ठाण्यात नोंद झाल्यानंतर सपोनि मालोजीराव देशमुख यांनी तपास करुन आरोपींविरुद्ध अति. जिल्हा व सत्र न्यायालय, वडूज येथे दोषारोपपत्र दाखल केले.
अति. जिल्हा व सत्र न्यायालयात सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील वैभव काटकर यांनी काम पाहिले. यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने 11 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपीला जन्मठेप व 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.