महाबळेश्वर : महाबळेश्वर नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर पालिका कार्यालयात डागडुजी व रंगरंगोटीला वेग आला आहे. नूतन नगराध्यक्ष गुरूवार, दि. 1 जानेवारी रोजी पदभार स्वीकारणार आहेत. या पार्श्वभूमीवर नव्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांसाठी स्वतंत्र कक्ष, तसेच छोटे-छोटे कार्यक्रमांसाठी सभागृह निर्माण करण्यासाठी येथे अंतर्गत बदल, डागडुजी आणि रंगरंगोटीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. 31 डिसेंबरपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे.
महाबळेश्वर पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या नूतनीकरणासाठी सहा वर्षांपूर्वी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. आराखडा तयार करून सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. सातारा येथील एका कंत्राटदाराची निविदा मंजूर झाली; मात्र त्यानंतरच सत्ताधारी-विरोधकांतील वाद पेटला. 12 नगरसेवक आणि तत्कालीन उपनगराध्यक्षांनी नूतनीकरणास विरोध केल्यामुळे काम थांबले. नंतर पुन्हा सामंजस्याने काम सुरू झाले. परंतु, निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप, ‘अर्थकारण’ आणि ‘देवाणघेवाण’संबंधी चर्चेमुळे पुन्हा काम ठप्प झाले. छताचे काम थांबवण्यापासून ते कंत्राटदाराने न्यायालयाची पायरी गाठण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रियेचे गुंतागुंतीचे स्वरूप निर्माण झाले. आजघडीला ही प्रशस्त इमारत कोंडवाडा बनून थांबली असून, कर्मचारी व नागरिक दोघांनाही प्रशासकीय गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
पालिका कर्मचारी ते थेट नगराध्यक्ष असा प्रवास करणारे सुनील शिंदे यांच्या कामकाजाबाबत शहरवासियांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. महाबळेश्वरची विस्कटलेली घडी पुन्हा बसवणे, नागरिकाभिमुख निर्णय घेणे आणि निधी खेचून आणून प्रशासकीय इमारतीचे काम मार्गी लावणे ही त्यांच्या टीमसमोरची प्रमुख आव्हाने आहेत. तसेच महाबळेश्वर या राज्यातील प्रमुख गिरिस्थानाचे नवीन प्रशासनिक भवनाचे डिझाइन अंतिम झाले आहे. आता या इमारतीच्या उभारणीसाठी लागणारा कोट्यवधींचा निधी मंजूर करण आणि ते पूर्ण करण्यासाठी नगराध्यक्ष व सत्ताधारी नगरसेवकांना मेहनत करावी लागणार आहे.