खंडाळा : खंडाळा शहरातील मध्यवस्तीत असणारे चावडी चौकातील गणेश ज्वेलर्सवर चोरट्यांनी दरोडा टाकला. दुकानाचे शटर व लोखंडी दरवाजा उचकटून चोरट्यांनी 2 किलो चांदी व तीन तोळे सोने असा 4 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. शनिवारी रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली.
शैलेश नारायण राजपुरे यांनी फिर्याद दिली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन चोरटे कैद झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी चांदीचे पैजण, हातातील कडे, छल्ले, चांदीची मर्जी अशी दोन किलो चांदी व सोन्याची बोरमाळ, ठसी, मनी, बुगड्या, नथ असे तीन तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे व सातारा येथील श्वान पथक व ठसे तज्ञ यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.